धुळे। ‘आमदार अनिल गोटे यांनी धुळेकर जनतेचा विश्वासघात केला असून आमदारकीचा वापर ते सेटलमेंटसाठी करत आहेत. आ.गोटे बड्या अधिकार्यांना ब्लॅकमेल करतात, विधानसभेत लक्ष्यवेधी लावण्याचा दम भरतात’, असा आरोप करून त्याच आशयाची एक कथित ऑडीओ क्लीप आज राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत ऐकवून खळबळ उडवून दिली आहे. वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांच्या प्रकरणातील त्यांची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले असून यावर गोटे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काय आहे क्लिपमध्ये ?
या क्लिपमध्ये आमदार अनिल गोटे हे भाजपचे कार्यकर्ते भिसे यांच्याशी बोलत आहेत. पत्रकार परिषदेत वाजविण्यात आलेल्या क्लिपमध्ये आ.गोटे आणि भिसे यांच्या संभाषणात मोपलवार, मांगले व केळकर यांच्या नावाचा उल्लेख येतो. तसेच ‘लक्षवेधी लावायची की नाही ?’ असाही उल्लेख येतो. मुंबई क्राईम ब्रॅचकडे तपास द्यायचा, मुंबई क्राईम बॅ्रचचे अधिकारी माझ्या संबंधातले आहे, मी करतो ते बरोबर, उद्या नागपुरला येतांना नवीन करंसी घेवून ये…जुनी नको, ते कुणी घेत नाही’ असे क्लीप मध्ये आ.गोटे हे भिसेंना सांगत आहेत. त्यामुळे हे प्रकरण भयानक असून संभाषणातील आवाज हा गोटेंचाच आहे. असा दावा मनोज मोरे यांनी केला आहे. फॉरेंसीक लॅबमध्ये हे संभाषण पाठवून त्याची खातरजमा करावी. या प्रकरणात एसआयटी नेमून आमदार गोटे यांच्यासहभिसे,केळकर, मोपलवार यांचे सीडीआर मागवावी. तसेच गोटेेंची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी मनोज मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ईडीतर्फे चौकशीची मागणी
या क्लीपमधील संभाषणामुळे आमदार गोटे यांची गोची झाली असून ते उघडे पडले आहे. त्यांच्या सेटलमेंट प्रकरणाची चौकशी व्हावी,एसआयटी नेमण्यात येवून त्यात ईडी,आयकर विभाग यांचा समावेश करावा आणि एसआयटीचे प्रमुख म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायधिश यांची नियुक्ती करावी. अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यातून ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या पंतप्रधानांच्या घोषणेला आव्हान देणारी आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचे वाभाडे काढणारी असल्याचे मनोज मोरे यांनी म्हटले आहे. समृध्दी महामार्गाचे प्रमुख मोपलवार यांच्या प्रकरणात देखील आ. गोटेंची भुमिका संशयास्पद आहे. आ.गोटेंनी मोपलवार प्रकरणात अधिवेशनात आपल्या हात शेकून घेतले. आ. गोटे यांचे ‘खायचे दात वेगळे व दाखविण्याचे दात वेगळे’ हे आता जनतेसमोर आले आहे. गोटे यांनी मांडलेले प्रश्नपुर्णत्वास गेलेली नाही.
गोटे शनिवारी मांडणार भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदर्भात आमदार अनिल गोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, “राष्ट्रवादीने पत्रकार परिषेदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप माझ्या आवाजाची आहे किंवा संबंधित व्यक्तीशी माझे झालेले संभाषण त्याबद्दल आणखी अधिक माहिती याचा खुलासा मी उद्या पत्रकार परिषेदेत घेऊन करणार आहे.” यामुळे ते काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.