आ. चाबुकस्वार म्हणून भलतीच व्यक्ती शेतकरी भेटीला पाठविला!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : भाजपचे नेते शेतकर्‍यांविषयी बेताल वक्तव्य करत असताना शिवसेनेकडून त्यांच्या वक्तव्यांचा निषेध केला जात आहे. शिवसेना नेतृत्त्वाने आमदारांना मराठवाड्यातील शेतकर्‍यांची भेट घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचना आमदारांकडून अजिबात गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसत आहेत. कारण शिवसेनेच्या आमदारांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या मराठवाडा शिवसंपर्क अभियनादरम्यान पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नावाने मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक यशोधर फणसे यांनाच उस्मानाबादमध्ये पाठविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आले आहे.

भाजपपाठोपाठ शिवसेनेकडूनही शेतकर्‍यांची थट्टा
शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, म्हणून शिवसेनेच्यावतीने मराठवाड्यामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले होते. यासाठी पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांची निवड मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि कळंब मतदारसंघांसाठी करण्यात आली होती. आ. चाबुकस्वार यांनी त्या ठिकाणी जाऊन थेट शेतकर्‍यांशी संवाद साधायचा होता. मात्र त्यांच्याऐवजी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक यशोधर फणसे हेच आमदार गौतम चाबुकस्वार म्हणून उस्मानाबादमध्ये दाखल झाले. चिखली गावात शिवसेनेचे पदाधिकारी, माजी आमदार ओमराजे निंबाळकर आणि माजी नगरसेवक यशोधर फणसे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांनी फणसे यांच्याकडे हातवारे करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आपल्याशी चर्चा करायला आमदार गौतम चाबुकस्वार यांना पाठवण्यात आले आहे’, असे सांगितले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळे भाजपसोबतच सत्ताधारी पक्षातील त्यांचा सहकारी पक्षदेखील शेतकर्‍यांची थट्टा करण्यात मागे नसल्याची चर्चा सुरु झाली. भाजपचे पदाधिकारी शेतकर्‍यांविषयी बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचबरोबर आता शिवसेनेनेदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शेतकर्‍यांची थट्टा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी सत्तेत दोन्ही पक्ष असलेल्या नेत्यांवर आणि पक्षांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दौर्‍याविषयी माहितीच नाही : आ. चाबुकस्वार
याविषयी आमदार गौतम चाबुकस्वार यांना विचारले असता, मला याबद्दल काहीही माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले. ‘मी हिमाचल प्रदेशला गेलो होतो. त्यामुळे या दौर्‍याबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. या दौर्‍याची माहिती किंवा कल्पना असती तर मी माझा दौरा रद्द केला असता आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे उस्मानाबादचा दौरा केला असता, असे चाबुकस्वार म्हणाले. ‘दुदैवाने या दौर्‍याबद्दल मला माहिती नव्हती. जे काही उस्मानाबादमध्ये घडले, त्याची माहिती मला नव्हती. हा संपूर्ण प्रकार मला प्रसारमाध्यमांतून समजला. जी व्यक्ती त्या ठिकाणी आमदार म्हणून गेली होती, त्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हा सर्व प्रकार गैरसमजातून घडला. याविषयी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या भेट घेणार आहे, अशी माहिती आ. चाबुकस्वार यांनी दिली.