पिंपरी-चिंचवड/पुणे : तब्बल तीन दशकांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथावून लावणारे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यात राज्यमंत्रिमंडळाच्या प्रस्तावित फेरबदलात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची माहिती पक्षसूत्राने दिली. गतआठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदील मिळाला होता. त्यानुसार, मुख्यमंत्री हे राजकीय गणिते डोक्यात ठेवून मंत्रिपदासाठी इच्छुकांची निवड करत आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रतिमेचा वापर पक्षकार्यासाठी चांगला होऊ शकतो, असा विचार करून त्यांच्याकडे पक्षाचे महत्वाचे पद तर आ. जगताप यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता पक्षाच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने वर्तविली आहे. तथापि, पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री आपला शब्द पाळणार असल्याचेही हे सूत्र म्हणाले. मिशन-2019ची तयारी आतापासून सुरु झाली असून, त्यादृष्टीने ग्रामीण भागात मंत्रिपद न देता शहरी भागातच मंत्रिपद देण्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल आहेत.
भाजपला हवेत आ. लांडगे पक्षकार्यात!
भाजप सूत्राच्या माहितीनुसार, राज्याच्या क्रीडा मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी आ. लांडगे यांना आपला बायोडाटाही मागविला होता. क्रीडा मंत्रिपदासाठी आ. लांडगे इच्छूक असून, तसा निरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. एकीकडे आ. लांडगे यांच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री अनुकूल असताना, आ. लांडगे यांना भारतीय जनता पक्षाच्या कामात सहभागी करून घेऊन राज्य पातळीवर त्यांच्या प्रतिमेचा वापर करून घ्यावा, असे प्रदेश भाजपकडून मुख्यमंत्र्यांना सूचविण्यात आलेले आहे. शिवाय, लोकसभेसाठीही पक्ष आ. लांडगे यांच्याकडे भावी उमेदवार म्हणून पाहात आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, आ. लांडगे व आ. जगताप यांचे दोघांचेही काम चांगले असल्याचा निष्कर्ष निघालेला आहे. आ. लांडगे यांना पक्षात मोठे पद देऊन सक्रीय करण्यासाठी विचार सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही, असेही सूत्र म्हणाले.
आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, शहराध्यक्ष आ. जगताप यांनी आपले पत्ते अद्यापही खोललेले नाहीत. तथापि, त्यांच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे वरिष्ठ पातळीवरूनच दबाव निर्माण झालेला आहे. मंत्रिपदाबाबत आ. जगतापांची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली असून, पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळू, अशी सामंजस्याची भूमिका आ. जगताप यांनी घेतलेली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ज्याचे जास्त नगरसेवक असतील त्यांना मंत्री करू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार, आ. जगताप यांचे नगरसेवक जास्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपला शब्द पाळताना आ. जगताप यांना मंत्रिपद देणे अत्यावश्यक आहे. महापालिकेतील सत्ता मिळविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही गटाला समानसंधी महापालिकेत दिलेली आहे. आ. लांडगे यांच्या गटाला महापौरपद तर आ. जगताप यांच्या गटाला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळालेले आहे. त्यामुळे या दोन्ही गटांत समान वाटप करण्याचे धोरण घेणारे मुख्यमंत्री मंत्रिपद वाटप करताना काय भूमिका घेतात याकडे मात्र पिंपरी-चिंचवडवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
पुण्यातून महिलांना प्रतिनिधीत्व मिळेल का?
या दोघांतील सुप्त राजकीय संघर्ष पाहाता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आ. जगताप किंवा आ. लांडगे यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी विचार न करता, एकवेळ मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्याही नावाचा विचार करू शकतात, असेही पक्ष सूत्राने सांगितले. तथापि, ही शक्यता अन्य एका स्थानिक भाजपनेत्याने फेटाळून लावली. काँग्रेस नेते रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरी-चिंचवडला एकदाही मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे आ. जगताप यांनाच मुख्यमंत्री मंत्रिपद देतील तर आ. लांडगे यांना महामंडळ किंवा पक्षात वरच्या पातळीवरची जबाबदारी मिळेल, असेही वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने सांगितले. पुण्यातूनही मंत्रिपदासाठी माधुरी मिसाळ यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. फडणवीस मंत्रिमंडळात महिलांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, यास्तव माधुरी मिसाळ यांना संधी देण्यात यावी, अशी आग्रही भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी मांडल्याची माहितीही भाजपसूत्राने दिली.