आ. जगतापांना शह देण्यासाठी प्रशांत शितोळे मैदानात!

0

शहर-जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळेंची वर्णी राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक!

पिंपरी-चिंचवड : एकेकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले प्रशांत शितोळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमागे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आ. जगताप यांच्यासह भाजपला शह देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी असल्याचे पक्षाच्या वरिष्ठस्तरीय नेतृत्वाने सांगितले. गत महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी नाकारली होती. परिणामी, त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाला होता.

अजित पवारांनी केली नाराजी दूर!
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटनेत महत्वपूर्ण बदल सुरु केले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना स्थायी समितीचे सभापतीपद भूषविलेल्या व तब्बल तीनवेळा नगरसेवक राहिलेल्या प्रशांत शितोळे यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्याहस्ते व माजी आ. विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत शितोळे यांना देण्यात आले. शितोळे हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. तसेच, ते आ. जगताप यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. आता आगामी निवडणुका पाहाता, त्यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस आ. जगताप यांच्याविरोधात करून घेणार आहे. बंडखोरी करून महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शितोळे यांनी पक्षापासून चार हात दूर राहणे पसंत केले होते. परंतु, अलिकडे त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करून अजित पवार यांनी त्यांना पुन्हा पक्ष संघटनेत सक्रीय केले आहे.

आगामी निवडणुका पाहाता राष्ट्रवादीचा निर्णय
भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आली असली तरी, राष्ट्रवादीचेच बहुतांश नेते भाजपवासी झाल्यामुळेच भाजपला ही सत्ता प्राप्त करता आली आहे. गेल्या वर्षभरात भाजपची अनेक प्रकरणे राष्ट्रवादीने चव्हाट्यावर आणली आहे. त्यात पक्षावर नाराज असलेले प्रशांत शितोळे हेदेखील अग्रेसर होते. भाजपातील रिंग, जुन्या बिलातील तीन टक्केवारीचे प्रकरण आदी त्यांनी चव्हाट्यावर आणले होते. महापालिका निवडणुकीची उमेदवारी त्यांना पक्षाने दिली असती तर ते आज चौथ्यांदा नगरसेवक असते. त्यामुळे मध्यंतरी ते पक्षावर नाराज होते. अजित पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून लक्ष्मण जगताप हे उभे राहणे निश्‍चित आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीतही भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला युवकांचे पाठबळ असलेला नेता हवा होता. त्यामुळे पवारांनी शितोळे यांना राजकीय ताकद देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वरिष्ठ स्तरीय सूत्र म्हणाले.