पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पक्षनेत्यांच्या बोलाविलेल्या महत्वपूर्ण बैठकीत बरेच रामायण-महाभारत घडले. यावेळी आमदारांनी मंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. तर मंत्र्यांनीही मुख्यमंत्रीच आम्हाला निधी देत नाही तर तुम्हाला काय देऊ? अशा शब्दांत हतबलता व्यक्त केली. याच बैठकीत शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या डॉ. नीलम गोर्हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. भाजपचे आ. लक्ष्मण जगताप यांना तुम्ही शिवसेनेत येण्याची ऑफर कशी काय दिली? असा खडा सवाल खा. बारणे यांनी आ. गोर्हे यांना विचारला. आम्हाला शिवसेना शिकवू नका, आम्ही निवडणूक लढलो आहोत, अशा शब्दांत बारणेंनी आ. गोर्हेंना फटाकरले. ठाकरे यांच्यासमोरच झालेल्या या वादामुळे आ. गोर्हे यांना अक्षरशः रडू कोसळल्याची माहिती या बैठकीतील एका आमदाराने दैनिक जनशक्तिशी बोलताना नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.
अन् खा. बारणेंनी आ. गोर्हेंची खरडपट्टी काढली!
शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार नीलम गोर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे त्यांना भेटले होते. यावेळी आ. गोर्हे यांनी आ. जगताप यांना चक्क शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही ऑफर देण्यात आल्याने राजकीय तर्क लढविले जाऊ लागले. ही बाब मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कानावर गेली होती. त्या मुद्द्यावरून खा. बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आ. नीलम गोर्हे यांची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, असे निर्णय घेण्याचे अधिकार नीलम गोर्हेंना कुणी दिले? आम्हाला शिवसेना शिकवू नये. आम्ही निवडणुका लढलो आहोत, असे खा. बारणे यांनी ठणकावले. आ. जगताप यांनी शिवसेनेत यावे, असे निमंत्रण देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा संतप्त सवाल करताच, आ. गोर्हे यांना भरबैठकीत रडू कोसळल्याचेही एका आमदाराने दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले.
माझी पक्षनिष्ठा उद्धव ठाकरेंना माहीत : आ. गोर्हे
खा. बारणे यांनी खरडपट्टी काढताच, आ. नीलम गोर्हे यांनीही खा. बारणेंवर टीकास्त्र डागले. माझी शिवसेना पक्षनिष्ठा काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. मला माझी निष्ठा कुणाला सांगण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांना चक्क रडू कोसळल्याने वातावरण चांगलेच तापले होते. शेवटी ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. मावळ लोकसभा निवडमुकीसाठी आ. लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, आ. गोर्हे यांनी आ. जगतापांना पक्षात येण्याची ऑफर दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिरुर मतदारसंघातून भाजपतर्फे आ. महेशदादा लांडगे तर मावळमधून भाजपतर्फे आ. लक्ष्मण जगताप यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. त्यातच मावळमध्ये सद्या शिवसेनेचेच खासदार बारणे हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आपल्यावर आ. गोर्हे या राजकीय कुरघोडी करत असल्याच्या संशयावरून त्यांनी संतप्त होत, ठाकरे यांच्यासमोरच गोर्हे यांची खरडपट्टी काढल्याने हा विषय सद्या मुंबईसह पिंपरी-चिंचवडमध्ये चांगलाच चर्चेचा ठरला होता.