सोलापूर : पंढरपूर येथील विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणार्या सैनिकाबद्दल अत्यंत गलिच्छ विधान भाषणाच्या ओघात केले. मात्र, त्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोलापूरमध्ये मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून त्यांच्या फोटोला चपला मारल्या.
त्यांना आपल्या चुकीबाबत उपरती झाल्याने नंतर वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. अनवधानाने आपल्याकडून असे वक्तव्य निघाले, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे म्हणत त्यांनी सैनिक आणि महिलांची माफी मागितली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना परिचारकांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांचा अपमान केला होता. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र, परिचारकांशी या वक्तव्यानंतर संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.
वादग्रस्त विधान
‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो, तुला मुलगा झाला. या आनंदात तो पेढे वाटतो,’ असं वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केलं होतं.
‘ते’ वक्तव्य अनवधानाने निघाले’
अनवधानाने माझ्याकडून असं वक्तव्य निघालं, यासाठी मी सर्व सैनिक बांधवांची आणि महिलांची माफी मागतो. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, तरीही सर्वांची माफी मागतो, असं परिचारक यांनी म्हटलं आहे.
– आमदार प्रशांत परिचारक