मुंबई : देशातील सैनिकांच्या पत्नींविषयी अत्यंत गलिच्छ वक्तव्य केल्याने वादात सापडलेले भाजपचे विकृतबुद्धीचे आमदार प्रशांत परिचारक यांना बुधवारी अखेर विधानपरिषदेतून निलंबित करण्यात आले. चौकशी समिती नेमून परिचारक यांचे वक्तव्य तपासले जाणार असून, त्याचा अहवाल येईपर्यंत ते निलंबितच राहतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावर उडवले होते शिंतोडे..
परिचारक हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करताना त्यांनी बोलण्याच्या ओघात सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले होते. सीमेवरील जवान मुलगा झाल्याचे पेढे वाटतो. पण तो वर्षभर घरीच गेलेला नसतो, असे परिचारक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. शिवसेनेनेही विरोधकांना पाठिंबा देत परिचारक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. परिचारक यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशाराच विरोधकांनी दिला होता. विरोधकांच्या या दबावापुढे सरकारला अखेर झुकावे लागले आहे. चंद्रकांत पाटील यांनी परिचारक यांच्या निलंबनाची माहिती विधानपरिषदेत दिली. येत्या दोन दिवसांत चौकशी समितीचा अहवाल येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.