आ. महाजन, आ. भोळे, लढ्ढा यांच्या बैठकीनंतरच भाजपाची सेनेला साथ

जळगाव- शहर महानगरपालिकेची महासभा अत्यंत शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडली. यावेळी जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामाचे ठराव असल्यामुळे जळगाव शहरातील सर्व नगरसेवकांनी एकमताने महा सभेतील सर्व ठराव एकमताने मंजूर केले. मागील महासभेत झालेला राडा लक्षात घेता यावेळेची महासभा इतकी शांततेत पार कशी पडली? असा प्रश्न समस्त जळगावकरांना पडला. यामागचे गुपित होते ते म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या झालेली बैठक.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत आलेले प्रस्ताव कित्येक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना मान्य नव्हते. यामुळे कित्येक नगरसेवक नाराज होते. अशा वेळेस विकास कामांना खोडा बसू नये आणि जळगाव शहराचा विकास व्हावा या उद्देशाने ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, आमदार राजूमामा भोळे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्ये शनिवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीमध्ये जळगाव शहराच्या विकासाचा फॉर्म्युला ठरला. त्यात जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत 42 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी द्यायची असे ठरले. निविदा शिल्लक आहेत अशा नगरसेवकांच्या निविदा पुढच्या महासभेत महासभेच्या पटलावर ठेवण्यात येतील. म्हणजेच ज्या वेळी 58 कोटी रुपयांच्या निधीसाठी विशेष महासभा बोलावली जाईल त्यावेळी उर्वरित नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करण्याबाबत एकमताने महासभेत ठराव मान्य केले जातील अशी चर्चा या गुप्त बैठकीत झाली.
नगरसेवकांचा विकास कामाला विरोध नव्हता पण..
जळगाव शहर महानगरपालिकेच्या विशेष महासभेत जे ठराव पारित झाले आहेत त्या विकास कामांना कोणत्याही नगरसेवकांचा विरोध नव्हता मात्र स्वतःच्या वॉर्डात देखील काम व्हावी अशी या सर्व नगरसेवकांची इच्छा होती. या नगरसेवकांच्या इच्छेचा मान ठेवत ही बैठक बोलावण्यात आली होती.