आ.रघुवंशी यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

0

नंदुरबार । यंदाच वर्ष हे निवडणुकीचे असल्याने त्या दृष्टीकोनातून आश्‍वासनांची पूर्तता नगरपरिषदेने केली आहे, असा दावा करतांनाच काँग्रेसचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी येत्या मार्चपासून निवडणुकीच्या कामाला लागत आहे, असे सांगून अप्रत्यक्षपणे आतापासूनच नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंगे फुंकले आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचा दावा

नंदुरबार नगरपरिषदेचा सन 2017-2018 चा अर्थसंकल्प नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सादर केला. कुठलीही दरवाढ न करता विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेसच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केला आहे. 1 कोटी 95 लाख अपेक्षित खर्च दर्शविणारा आणि 14 लाख 86 हजार रूपये शिल्लकी असलेला हा अर्थसंकल्प पालिकेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

विकासकामांचा लेखाजोखा मांडला

आ.रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेवून नगरपालिकेने राबविलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नंदुरबारकरांना दिलेल्या वचनांची पुर्तता नगरपरिषदेने केली आहे. रस्ते, बगीचे, पाणी, आरोग्य स्वच्छता यासह अन्य विविध प्रकल्प राबवून नंदुरबारचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत लोकांसमोर विकासाचा हाच किताब घेवून जात आहोत. विरोधक कुणीही असो काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आपण फिरणार आहोत. त्याची सुरूवात येत्या मार्च महिन्यापासून करणार असल्याचा सूतोवाच आ.रघुवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.