पिंपरी (प्रतिनिधी) : भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा. रहिवाशांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लागावी, या हेतूने आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी शहरामध्ये एक लाख कापडी पिशव्या वाटपाचा संकल्प केला आहे. या पिशव्यांच्या वाटपास सुरुवात केली आहे. गुरूवारी पिंपळे गुरव भागात सुमारे 2 हजार महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी त्यावर उपाय सुचवलेला नाही. त्यामुळे लपून-छपून व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. शहरात खरोखरच प्लास्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी रहिवाशांना पर्याय देणे आवश्यक आहे. यासाठी भाजपाने कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रिक्षा वाहनतळ, मॉल्स, दुकाने, बाजारपेठ, बस थांबे, रेल्वे स्थानके या ठिकाणी उभे राहून कार्यकर्ते कापडी पिशव्या वाटप करणार आहेत. या पिशव्यांवर शहर स्वच्छता, पाणी बचत याविषयी घोषवाक्ये लिहिण्यात आली आहेत.
यावेळी शहर प्रवक्ते अमोल थोरात, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंडे, विजया ननावरे, सुरेखा सूर्यवंशी, संगीता बामग़ुड, कल्पना शिंदे, संगीता डिखळे, प्रतिभा चव्हाण, स्वाती गुरव, वैशाली घाडगे, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले आदी उपस्थित होते.
* नागरिकांची जनजागृती हाच उद्देश
यावेळी आमदार लक्ष्मण ज़गताप म्हणाले की, शहरात आम्ही मोफत एक लाख कापडी पिशव्या वाटप करणार आहोत. सरकारने प्लास्टिक बंदी केली असल्याने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी करावी हाच उद्देश आहे. त्यासाठी आमचा कापडी पिशव्या वाटप करण्याचा संकल्प आहे. प्लास्टिक बॅग्जपासून होणारे पर्यावरणाचे नुकसान सर्वानाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅगच्या वापरामुळे होत आहे. प्लास्टिकची पिशवी निर्माण झाल्यानंतर ती नष्ट होण्यासाठी सुमारे हजार एक वर्ष लागतात. प्लास्टिक नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसते. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.