आ. लांडगेगटावरील कुरघोडीने ‘भाऊं’ची भाजपवरील पकड उघड!

0

लांडगेगटाची बंडखोरी ठरली औटघटकेची : राष्ट्रवादीही पडली तोंडघशी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कुण्या आमदाराच्या घरी जाणार याबाबत महापालिका वर्तुळात गेल्या आठवड्यात जोरदार चर्चा रंगली होती. अखेर अपेक्षेप्रमाणे या चाव्या चिंचवड मतदारसंघाचे आमदार तथा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी आपल्याच हाती ठेवल्या आहेत. त्यांच्या कट्टर समर्थक ममता गायकवाड यांना पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी स्थायीचे सभापतिपद मिळवून दिले आहे. भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना हे पद मिळावे म्हणून आ. लांडगे यांनी जोरदार दबाव निर्माण केला. महापौर नितीन काळजे, स्थायीचे सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे यांनीही राजीनामे दिले. परंतु, हे राजीनामे खिशात ठेवून आ. जगताप यांनी त्यांच्याकडून गायकवाड यांच्यासाठी मतदान करून घेतले. त्यामुळे भाजप बंडखोरांच्या जोरावर अवघी चार मते असतानाही निवडणुकीत उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे हे चांगलेच तोंडघशी पडले. भाजपची 10 मते, 1 मत सहयोगी अपक्ष अशी 11 मते गायकवाड यांना पडली असली तरी, राष्ट्रवादीची दोन मते फोडण्याचीही खेळी आ. जगताप यांनी रचली होती. परंतु या निवडणुकीत गुप्तपद्धतीने मतदान न झाल्याने ती यशस्वी होऊ शकली नाही. अन्यथा, गायकवाड यांना 13 मते व भोंडवे यांना केवळ दोन मते पडली असती, अशी माहितीही महापालिकेच्या राजकारणातील दिग्गजाने दिली आहे.

महापौरपदाची दुसरी टर्म आ. लांडगे गटाकडे?
स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपमधील गट-तटाचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. चिंचवडचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार तथा भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे आणि खा. अमर साबळे यांचा निष्ठावंतांचा तिसरा गट असे तीन गट प्राकर्षाने दिसून आलेत. सभापतिपदासाठी राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांच्यात चुरस दिसून आली असली तरी आ. जगताप यांनी ऐनवेळी आपल्या कट्टर समर्थक ममता गायकवाड यांना पुढे केले. एवढेच नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठांना व्हिप बजावून केवळ गायकवाड यांचाच अर्ज भरविण्यास लावला. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक चाव्या हाती घेण्याचे प्रयत्न करणारे आ. लांडगे यांना जोरदार धक्का बसला. त्यातून महापौरांनी राजीनामा दिल्याने ‘राम-लक्ष्मणा’ची ही जोडी फुटली की काय, अशी शंका आली. परंतु, आ. लांडगे गटाचे बंड मोडित काढण्यासाठी आ. जगताप यांनी प्रदेश पातळीवरील नेतृत्वाला मध्यस्थी घातले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनीही आ. लांडगे गटावर दबाव आणून त्यांना बंडखोरी न करण्याची सूचना केली. त्यामुळे ममता गायकवाड या विजयी होऊ शकल्या. स्थायीचे सभापतिपद गायकवाड यांच्या रुपाने आ. जगताप गटाला मिळाले असल्याने महापौरपदाची दुसरी टर्मही आ. महेश लांडगे गटाकडे ठेवण्याचा सौदा मात्र आ. जगताप यांनी मान्य केला असल्याचे भाजपच्याच वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले आहे.

पडद्यामागे काय घडले?
सभापतिपदावरून राजीनामानाट्य रंगल्यानंतर मंगळवारी रात्री भाजपची कोर कमिटी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसली होती. या बैठकीला बंडखोरांसह महापौर नितीन काळजे आणि आमदार उपस्थित होते, अशी माहिती वरिष्ठ नेत्याने दिली. याच बैठकीत भाजपच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे ठरले होते. अन्यथा, शहरात व राज्यात चुकीचा संदेश जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी आ. लांडगे यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा झाली. त्यात आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती आ. लांडगे यांनी केली होती. त्यात महापौरपद तुमच्याकडे ठेवू, विषय समित्यांत ही उणिव भरून काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे नाराजांनी भाजपच्याच उमेदवारांना मतदान करून राष्ट्रवादीच्या इराद्यांवर पाणी फेरले. शिवसेनेने तठस्थ रहावे किंवा भाजपच्या बाजूने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही मतदान करावे, अशी विनंती भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने केली होती. ती लक्षात घेऊन शिवसेनेने दोन्ही महापालिकांत तठस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे दोन्हीही ठिकाणी राष्ट्रवादीची चांगलीच नाचक्की झाली.