अमळनेर । जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅग शिप (प्रमुख उपक्रम) आहे. राज्यभरात लोकसहभागातुन व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवाराचे काम करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्य 2019 पर्यत दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जलयुक्तचे कामे करण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील कुर्हे बु. येथील चिखली नदीवर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बंधार्यांचे बांधकाम करण्यात येणार असून आमदार शिरीश चौधरी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या नदीवर लोकसहभाग आणि हिरा उद्योग समूहाच्या आर्थिक योगदानातून नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले असून सिमेंट बंधार्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आडवले जाऊन शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
11 लाखांचा निधी मंजूर
आमदार चौधरी यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत 11 लाख निधीतून या सिमेंट बंधार्यांचे काम मार्गी लावले आहे. कुर्हे बु., कुर्हे खु. ही गावे चिखली नदी काठावर असूनही या नदीवर एकही बांध नसल्याने पावसाळ्यात नदीला आलेले संपूर्ण पाणी वाहून जात होते, परीणामी येथील विहीरी कोरड्या राहून शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या कायम भेडसावत होत्या.
खोलीकरणाचे काम लोकसहभागातून
नदीत वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी जिरत नव्हते. अखेर संपूर्ण मतदार संघात हिरा उद्योग समूहाच्या मदतीने नाला खोलीकरण मोहीम राबवून सिंचन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आमदार शिरीष चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी यांनी केले आहे. कुर्हे गावाची परिस्थिती लक्षात घेऊन चिखली नदीवर खोलीकरणाचे काम हाती घेतले यासाठी हिरा उद्योग समूह आणि लोकसहभागातून मोठा निधी उपलब्ध झाल्यान खोलीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित
तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून भविष्यात दुष्काळावर मात करता येणार आहे. तसेच ओलिताखालील क्षेत्र वाढणार असल्याने शेतकर्यांना लाभ होणार आहे. भूमिपूजन प्रसंगी प्रा.अशोक पवार, अॅड.व्ही आर पाटील, अॅड.सुरेश सोनवणे, अॅड.दीपेन परमार, नरेंद्र चौधरी, सुनील भामरे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विलास पाटील, सतीश पाटील, महेंद्र पाटील,भरत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.