जळगाव । जळगावात लग्नासाठी येत असताना दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास मानराज पार्कसमोर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतिष पाटील यांच्या वाहनावर हेल्मेट घातलेल्या दुचाकीवरील दोन तरूणांनी अचानक फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती. जळगावात नातेवाईकाकडे लग्न असल्यामुळे आमदार सतिष पाटील हे दुपारी पाळधीकडून जळगावाकडे (एमएच 15 ईएक्स 9009) क्रमांकाच्या कारने चालक गुलाब पाटील, पीए भैय्या माणिक आणि आरटीपीसी कोकणे यांच्यासह येत होते. दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास मानराज पार्क समोरून जात असतांना आमदार पाटील यांच्या वाहनासमोरून एका दुचाकीवर दोन हेल्मेट घातलेले तरूण भरधाव वेगात येऊन त्यांनी चालकाच्या दुसर्या बाजूच्या समोरील काचवर फायटरने हल्ला केला. यात कारचे काच फुटले. यानंतर ते पाळधीच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, या घटनेत कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान, हे हल्लेखोर नियोजनपूर्वक आल्याचे समजते. या घटनेमुळे शहरासह पारोळ्यात खळबळ उडाली होती.