जळगाव । लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्यास गुरुवारपासून (दि.२८) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रावेर लोकसभा
मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले मात्र, दुपारपर्यंत आ. स्मिता वाघ यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे. आज त्याची अधिसूचना प्रसिध्द झाली. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनुक्रमे खा. रक्षा खडसे व आ. स्मिता वाघ गुरुवारी आपले नामनिर्देशन दाखल करतील, असे नियोजन पक्षाकडून करण्यात आले होते. यावेळी शक्तिप्रदर्शनही केले जाणार होते. प्रत्यक्षात मात्र, खा. खडसे यांनीच आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. आ. स्मिता वाघ दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांचे तिकीट कापून आ. वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयाला ए. टी. नाना पाटील व पक्षातील काहींचा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी पारोळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात खा. पाटील यांनी वाघ दाम्पत्यावर टीका केली होती. तसेच काँग्रेस उमेदवार बदलू शकते, तर भाजपाही तसा निर्णय घेऊ शकते, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. स्मिता वाघ यांच्या उमेदवारी अर्जाविषयी वेगवेगळ्या चर्चांना फुंकणी मारणारी ठरली आहे. दरम्यान, आ. स्मिता या शुक्रवारचा मुहूर्त साधत आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यामुळे आजची उत्सुकता उद्यापर्यंत ताणली गेली आहे.
Next Post