राज्य कृषी शिक्षण, संशोधन परिषद उपाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती
जळगाव: दर्जेदार केळी, कापूस आणि वांगी यांच्या उत्पादनासाठी जगविख्यात असलेल्या कृषिप्रधान जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक बहुमान आला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी रावेरचे आ. हरिभाऊ जावळे यांची नियुक्ती शासनाने केली आहे.
जळगाव जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्थांच्या उभारणीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याला आ. हरिभाऊ जावळे यांच्या आजच्या नियुक्तीमुळे चालना मिळण्याची आशा जिल्हावासियांना आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2) (ब) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या आ. हरिभाऊ जावळे यांचा दर्जा हा कॅबिनेट मंत्रिपदाचा असणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती आहे, असे यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे.
‘लॅब टू लॅण्ड’ ही संकल्पना राबविणार
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे देवून मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करायचे आहे. यासाठी ‘लॅब टू लॅण्ड’ ही संकल्पना राबविण्याचा मानस आहे. कारण प्रयोग शाळेतील संशोधन थेट शेतकर्यांच्या शेतात पोहचले तर पंतप्रधानांचे स्वप्न निश्चित पूर्ण होईल.
:आ. हरिभाऊ जावळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद