जळगाव। जिल्ह्यात दहावीची परिक्षा सुरू असून आज शनिवारी इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. मात्र, इंग्रजीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात प्रश्न पत्रिका वर्गाबाहेर आणून त्याची झेरॉक्स काढून सर्रासपणे कॉपी पुरविल्याचा प्रकार शहरातील काही परीक्षा केंद्राबाहेर दिसून आला. तर काही ठिकाणी दहा रुपयांमध्ये दहा गुणांच्या उत्तराची झेरॉक्स विक्री करताना आढळून आले. यामुळे परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात आलेला बंदोबस्त, भरारी पथक सर्वच यंत्रणेच्या नाकावर टीच्चुन कॉपी अभियानाचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
संवेदनशील केंद्रावर तगडा बंदोबस्त
आज इंग्रजीचा पेपर असल्याने प्रशासनाकडून काही संवेदनशील केंद्रावर पेपर सुरु होण्याआधी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासातच या बंदोबस्ताची ‘ऐसी की तैसी’ करत कॉपी बहाद्दरांनी वर्गात जावून प्रश्न पत्रिकेतील महत्वाचे प्रश्न फोडून त्या प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थीपपर्यंत पोहचविण्यात आली. तर अनेक केंद्राबाहेर जरी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरी मात्र वर्गांमध्ये शिक्षकांच्या संगणमताने सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.
अॅग्लो उर्दू मध्ये फुटला पेपर
संवेदनशील केंद्र असलेल्या अॅग्लो उर्दू हायस्कूलच्या बाहेर अनेक युवकांच्या झुंडी कायम होत्या. पेपर सुुरु झाल्यानंतर अर्धा तासातच वर्गातून प्रश्न पत्रिका फोडण्यात आली होती. तसेच प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स काढून अपेक्षीत, नवनीतच्या मदतीने संबधित प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थीपर्यंत पुरुविली जात होती. प्रश्नपत्रिकेचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता. युवकांनी परीक्षा केंद्रापासून पळ काढला. तर परीक्षा केंद्राच्या मागील बाजुच्या गेटव्दारे परीक्षार्थींना सर्रासपणे कॉप्या पुरविल्या जात होत्या. यामुळे सर्रासपणे कॉप्या सुरू होत्या.
दहा रुपयांमध्ये विक्री
गुळवे विद्यालयाच्या बाहेर काही व्यक्तींकडून प्रश्नपत्रिकेतील काही प्र्रश्नांची उत्तरे असल्याचा दावा करत दहा रुपयांमध्ये एक प्रिंट अशी विक्री केली जात होती.
अशीच स्थिती विद्यानिकेतन च्या केंद्रावर देखील पहायला मिळाली. जिल्हा ग्र्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाच्या भिंतीवर चढून वर्गांमध्ये हे कागद पोहचविले जात होते.