धुळे । येथील चिमठाणे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत 36 पैकी फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उर्वरित सर्व 22 विद्यार्थी इंग्रजी विषयातच अनुत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयात इंग्रजीचा विषयासाठी शिक्षकच नसल्याने ही स्थिती ओढवल्याचा आरोप करत पालक व विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत एकूण 36 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इंग्रजीचे विषय शिक्षक प्रा. एम. व्ही. पाटील 31 मे 2016 ला निवृत्त झाल्यानंतर या विषयासाठी शिक्षकाची वर्षभर भरतीच करण्यात आली नाही. विषय शिक्षक नसल्याने इंग्रजी विषयात फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयात इंग्रजी विषयासाठी कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांसाठी एक महिना शिंदखेडा (जि. धुळे) येथून शिक्षक मागविण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितीद्वारेच इंग्रजी विषयाचे शिक्षण देण्यात आले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. महाविद्यालयातील 36 पैकी केवळ 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अन्य 22 विद्यार्थी इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल संतप्त पालकांतून उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही संतप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली आहे.