भुसावळ : मुलांमध्ये असलेली इंग्रजी भाषाविषयीची भिती दूर करण्यासाठी प्रारंभी त्यांना बोलते केले पाहिजे. मुलांना इंग्रजी बोलण्याकडे कसे वळविता येईल यासाठी शिक्षकांनी आपल्याला इंग्रजी येत नाही असा न्यूनगंड काढून टाकून स्वतः इंग्रजी बोलण्यावर भर दिला
पाहिजे, असे आवाहन स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणाचे जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता डॉ.डी.बी. साळुंखे यांनी केले.
श्रवण, वाचन, लेखन व संभाषणातून भाषिक कौशल्य प्राप्त
शालेय शिक्षण विभाग व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यात चार ठिकाणी दहादिवशीय जिल्हास्तरीय स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण वर्ग पार पडला. जळगाव येथील डीआयईसीपीडी चिंचोली येथे पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाप्रसंगी डॉ. साळुंखे म्हणाले की, कोणतीही भाषा शिकतांना भाषिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. श्रवण, वाचन, लेखन, भाषण, संभाषण अशी भाषिक कौशल्ये आहेत. आपल्या मातृभाषेचा विचार केला तर आपण लहानपणापासून आधी भाषण संभाषण शिकत असतो. त्यानंतर इतर कौशल्यांकडे वळतो. अशावेळी व्याकरणाचा नियम आपण पाळतोच असे नाही. यालाच अनुसरून इंग्रजी भाषेविषयीदेखील विचार करण्याचे आवाहन डॉ. साळुंखे यांनी केले. यावेळी प्रशिक्षक प्रमोद आठवले, मनीषा शिरसाठ, द.शि. विद्यालयातील उपशिक्षक डॉ. जगदीश पाटील, विलास सूर्यवंशी उपस्थित होते.
तीन टप्प्यात प्रशिक्षण
त्यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षण वर्गात जळगाव येथे प्रशिक्षक मनिषा शिरसाठ व समन्वयक विलास सुर्यवंशी, यावल येथे प्रशिक्षक अल्ताप अली व समन्वयक पुरूषोत्तम झाडे, पाचोरा येथे प्रशिक्षक शैलेश शिरसाठ व समन्वयक गिरिष भोयर तर धरणगाव येथे प्रशिक्षक तुषार वडगावकर व समन्वयक सुरेश भाईमारे होते. एकूण दहा दिवसांचा हा प्रशिक्षण वर्ग जिल्हाभरातून मागणी केलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभाग व राज्य आंग्लभाषा अध्यापन संस्था यांनी तीन टप्प्यात आयोजित केला होता.