इंग्रजी शाळांनाही लाजवेल अशी नगरपालिकेची शाळा

0

भुसावळात वातानुकूलित शाळेच्या लोकार्पण प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे ; नगसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या उपक्रमाचे मान्यवरांनी केले कौतुक ; स्व-खर्चातून बदलले शाळा क्रमांक 35 चे अंतरंग व बाह्यरंग

भुसावळ- निवडणुकीत प्रत्येक जण विकासकामांवर मतदान मागतो मात्र मतदान संपल्यानंतर नागरीकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मोजकेच लोक करतात. नगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा चांगला असला तरी अंतरंग व बाह्यरंग चांगले नसल्याने या शाळांकडे पाठ फिरवली जाते मात्र शहरात पालिकेच्या माध्यमातून शाळा क्रमांक 35 चे अंतरंग व बाह्यरंग बदलले गेले. नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी स्वखर्चातून वातानुकूलीत यंत्रणा बसवून समाजात आदर्श निर्माण केला असल्याची भावना माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केली. शहरातील प्रभाग 20 मधील दिनदयाळनगरातील पालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये वातानुकूलीत शाळा वर्ग खोल्यांच्या लोकार्पणावेळी ते बोलत होते.

नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर एक पाऊल पुढे
दिल्लीतील शासकीय शाळा वातानुकूलीत करण्याचा मानस तेथील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला मात्र आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. मात्र भुसावळातील आमच्या भाजपचे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी एक पाऊल पूढे टाकत शाळा वातानुकूलीत केली. दिल्लीतील मुख्यमंत्र्यापेक्षा आमचे भाजपचे नगरसेवक एक पाऊल पुढे असल्याचे सांगत खडसे म्हणाले की, सध्या अधिक प्रमाणात प्रवेश शुल्क घेणार्‍या मोठ्या अनेक शाळा आहेत. त्यांनाही लाजवेल, अशी ही शाळा पालिकेने साकारली आहे. चलो जहा दिप जलाये जहा अभी अंधेरा है ये प्रेरणादायी विचार जनसंघाचे पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनी व्यक्त केले होते. त्यांच्याच नावाने असलेल्या दिनदयाळ नगरातील शाळा क्रमांक 35 मध्ये पालिकेच्या माध्यमातून वातानुकूलीत शाळा उभी राहिली. ही बाब कौतूकास्पद आहे.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, स्विकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे, मनोज बियाणी, आयोजक नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास भाजप नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, गटनेता मुन्ना तेली, वसंत पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, अजय नागराणी, प्रकाश बतरा, सुषमा पाटील, मुकेश गुंजाळ, सतीश सपकाळे, देवेंद्र वाणी, अ‍ॅड. बोधराज चौधरी, अमोल इंगळे, पुष्पा बतरा आदींसह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांकडून विकासकामात खोडा
शाळा क्रमांक 35 चे सुशोभिकरण, बालोद्यान व नवीन वर्ग खोल्यांच्या कामाला जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी लेखी विरोध दर्शवला. या प्रकरणाचा नगराध्यक्ष रमण भोळे यांनी खरपूस समाचार घेतला. चांगल्या कामांमध्ये खोडा घालण्याचे काम विरोधक करीत असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगत आता आम्ही चांगले काम करतोय तर त्यांना पोटशुळ उठतेय अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
लोकार्पण सोहळ्यात नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या तर्फे दहावी व बारावी परिक्षेतील 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यासाठी फोल्डर तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या आईला टिफिन भेट देण्यात आला. यावेळी रक्षा खडसे यांचा दुसर्‍यांदा खासदारपदी विजय मिळविल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.

विदेशवारीपेक्षा जीवनभराचा आनंद मिळाला -महेंद्रसिंग ठाकूर
तब्बल सव्वादोन लाख रुपये स्व-खर्चातून शाळेच्या विकासकामासाठी वापरले. या पैशातून मी विदेश वारी करु शकलो असतो, पण त्या आठ दिवसांच्या आनंदापेक्षा शाळेच्या कामातून जीवनभराचा मिळणारा आनंद मोठा आहे. दिनदयाळ नगरातील शाळा क्रमांक 35 मध्ये केवळ दोन वर्गखोल्या होत्या. आता दुप्पट झाल्या असून आता जूनी इमारत दुमजली करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी भावना भाजपाचे प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर म्हणाले.