इंग्रजी शाळांना खैरातीप्रमाणे परवानगीने मराठी शाळांची अवस्था बिकट

0

नंदुरबार । शासनाने इंग्रजी शाळांना खैरातीप्रमाणे परवानगी दिली असल्याने मराठी शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे. परंतु अरबी, उर्दू, फारसी शब्दांचा स्विकार करीत हिंदी भाषा जशी समृध्द झाली त्याप्रमाणे इंग्रजीचा अव्हेर न करता मराठी भाषा अधिक समृध्द करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत आणि मराठी भाषाशुध्दीची टोकाची भूमिकाही त्याज्य आहेे, असे प्रतिपादन 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी केले.नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व देवमोगरा एज्यूकेशन सोसायटी आयोजित नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी डॉ.अक्षयकुमार काळे बोलत होते. आदिवासी संत श्री गुलाम महाराज साहित्य नगरीत आज पार पडलेल्या या 7 व्या जिल्हा साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानी नंदुरबारचे पत्रकार रमाकांत पाटील होते.

आदिवासी संस्कृतीच्या प्रचारप्रसारांचे कौतूक
सकाळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळ,े जिल्ह्यातील संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. साहित्य नगरीचे उदघाटन खासदार डॉ.हीना गावित यांच्या हस्ते व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीच्या प्रचारप्रसाराच्या प्रयत्नांचे याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी कौतूक केले. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.विश्‍वासराव पाटील, दोंडाईचा येथील डॉ.रविंद्र टोणगांवकर, डॉ.पितांबर सरोदे, दीनानाथ मनोहर, डॉ.अलका कुलकर्णी, प्रा.निंबाजीराव बागूल, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, निखिल तुरखीया उपस्थित होते.

साहित्यिक, रसिक मनोमिलनातूनच वाड्.मय समृध्दी
मराठी भाषेचे सखोल ज्ञान असेल तरच इंग्रजीवर स्वार होता येईल डॉ.काळे यांनी उदघाटनपर भाषणात वाडमयीन संस्कृतीची जोपासना विषद करतांना तिचा मूळ पाया असलेल्या भाषेची दुरावस्था मांडली. संत ज्ञानेश्‍वर आणि म्हाईंभट हे आधी संस्कृत भाषेचे पंडित होते व म्हणून त्यांना बहुजनांना समजणार्‍या मराठीतून लिखाण मांडता आले, याचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, मराठी भाषेचे खोल ज्ञान असेल तरच इंग्रजीवर स्वार होता येईल, इंग्रजीचा ओढा वाढल्याने मराठी शाळा भिकारणीसारख्या झाल्या असून सरकारी धोरण त्यालाच पोषक आहे, श्रेष्ठ साहित्यकार आणि श्रेष्ठ रसिक यांच्या मनोमिलनातूनच वाडमय समृध्दी साधता येईल. वाचकाला आस्वाद प्रक्रिया समजली तरच साहित्यिकाने मांडलेली अनुभूती वाचकाच्या मनाला पोहोचते आणि यातच वाडमय संस्कृती समृध्दीचे गमक आहे, असेही डॉ.अक्षयकुमार काळे म्हणाले.

पुस्तकांचे प्रकाशन
अध्यक्षीय भाषणात रमाकांत पाटील यांनी साहित्यात मांडावी अशी विपुलता या जिल्ह्यात हजारो वर्षांपासून असून नवसाहित्यकारांनी बाहेरच्या जगात ते पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मांडले. यानंतर बालकवींचा कट्टा, दोन विषयावरील परीसंवाद, कवी संमेलनातही मान्यवरांनी सहभाग घेतला. कृषी, शिक्षक, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. योगेंद्र जोशी, नीरज देशपांडे आणि सौ.सुलभा महिरे लिखित पुस्तकांचे प्रकाशन डॉ.अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले.