इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक

0

लंडन । इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी ब्रिस्टॉलमध्ये अटक करण्यात आली होती. या 26 वर्षीय इंग्लिश क्रिकेटपटूला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी कुठल्याही आरोपाविना त्याची सुटका करण्यात आली. ब्रिस्टॉलच्या एका नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी स्टोक्सला अटक करण्यात आली होती. ही घटना घडली त्यावेळी स्टोक्ससह त्याचा संघातील सहकारी अ‍ॅलेक्स हेल्सही तिथे उपस्थित होता. या दोघांनाही संघातून निलंबित करण्यात आले असून, त्यांना बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार्‍या चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळता येणार नाही. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे जिंकल्यानंतर स्टोक्स आणि हेल्स दोघे नाईटक्लबमध्ये गेले होते त्यावेळी ही घटना घडली असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

पुढची वन-डे मॅच खेळू शकणार नाही
या हाणामारीत स्टोक्सच्या हातालाही मार लागला. चौथ्या वनडेपूर्वी ओव्हलवर झालेल्या सरावाला स्टोक्स आणि अ‍ॅलेक्स दोघेही गैरहजर होते. पोलिसांच्या मदतीसाठी हेल्स पुन्हा बिस्टॉलला गेला होता. मी बेनला भेटायला ब्रिस्टॉलला गेलो होतो. आम्ही सुद्धा या प्रकरणाची चौकशी करु. ठरल्याप्रमाणे अ‍ॅशेस मालिकेसाठी संघाची निवड होईल असे इंग्लंडचे क्रिकेट संचाल अँण्ड्रयू स्ट्रॉस यांनी सांगितले. बेन आणि अ‍ॅलेक्स दोघेही पुढच्या वनडेमध्ये खेळणार नाहीत. या घडीला मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही असे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले.