इंग्लंडसाठी रहाणेचा मुंबईतच सराव

0

मुंबई । भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्‍यासाठी मुंबईकर अजिंक्य रहाणेला स्थान मिळाले नसले तरी त्याच्या आशा मात्र संपुष्टात आलेल्या नाहीत. अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी खेळल्यानंतर भारताचा संघ आयर्लंड आणि नंतर इंग्लंडला रवाना होणार आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रहाणे वांद्रे-कुर्ला संकुलात सराव करत आहे.मी नेहमीच मुंबईत माझ्या सरावाला सुरुवात करतो. प्रत्येक स्पर्धेआधी मुंबईतूनच माझ्या सरावाचा श्रीगणेशा होत असतो. इंग्लंड दौर्‍याविषयी माझे निवड समितीशी बोलणे झाले असून त्यांनी इंग्लंड दौर्‍याविषयी मला सज्ज होण्याकरिता सांगितलं आहे असे अजिंक्य रहाणे म्हणाला.

इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेता यावे, यासाठी काही कसोटीपटू लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत. इंग्लंडमध्ये ते काही सराव सामनेही खेळणार आहेत. मात्र रहाणेला याविषयी कोणतीही कल्पना नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर काय होईल, हे सांगता येत नाही. पण मी निवड समितीशी नक्कीच बोलेन, असे रहाणेने सांगितले. रहाणेचा खराब फॉर्म पाहता, त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान देताना निवड समिती सकारात्मक नाही. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही रहाणेची इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेमध्येही त्याच्या समावेशाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.