मंगळवेढा (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यात केवळ एकच इंजिनिअरिंग व फार्मसी द्वितीय वर्षाच्या प्रवेश निश्चितीचे शासकीय केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांची तोफा गर्दी होत असून प्रवेशासाठी उन्हात दिवसभर तिष्ठत थांबावे लागत आहे. परिणामी रविवारी तंत्रनिकेतन सोलापूर येथील केंद्रावर दुपारी एका मुलीला भोवळ आल्याने ती जमिनीवर कोसळल्याचा प्रकार घडल्यामुळे तंत्रनिकेतन प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पालकवर्गातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेत इंजिनिअरिंग द्वितीय व फार्मसी द्वितीय वर्गासाठी प्रवेश निश्चिती केंद्र असून सोमवार दि.31 जुलै हा शेवटचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चितीसाठी कागदपत्रे तपासणे व निश्चितीकरण आदी कामे सुरू आहेत. रविवारी या केंद्रावर जिल्ह्यातून जवळपास 1 हजार विद्यार्थी कागदपत्रे तपासणीसाठी आली होती. तंत्रनिकेतन प्रशालेच्या प्रशासनाने इंजिनिअरिंग व फार्मसी असे वेगळे विभाग न करता एकत्र तपासणी राबविल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होवून प्रशालेच्या मैदानात लांबलचक रांगा लागल्या होत्या. सकाळपासून रांगेमध्ये उभ्या असलेल्या एका मुलीला उष्णतेची झळ बसल्याने तिला चक्कर आल्याने ती खाली कोसळली. तात्काळ तेथे उपस्थित असलेला महांतेश्वर स्वामी या मुलाने त्या मुलीला पाणी दिले व थोडे खायला दिल्यानंतर कालांतराने तिची बोहळ गेली व प्रशासनाने तिचा फॉर्म तात्काळ भरून तिला तिच्या गावी पाठविल्याचे सांगण्यात आले. या मुलीचे नाव मात्र समजू शकले नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात दुरवरचा तालुका म्हणून करमाळ्याला ओळखले जाते. करमाळा येथील विद्यार्थ्याला सोलापूरला येण्यासाठी मोठा प्रवास खर्च करून यावे लागते. करमाळा व सोलापूर हे अंतर दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासासाठी बराचसा वेळ जातो. प्रवेश केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांना तासनतास उभा राहूनही नंबर येत नाही. शासनाने करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर या पाच तालुक्यासाठी पंढरपूर येथे तर सोलापूर दक्षिण व उत्तर, अक्कलकोट, माढा, बार्शी, मोहोळ या तालुक्यांसाठी सोलापूर येथे फॉर्म निश्चिती केंद्र सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा वेळ व पैशाची बचत होईल असे पालकांचे मत आहे. शासनाने इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष व फार्मसी द्वितीय वर्ष प्रवेश निश्चितीसाठी केवळ तीनच दिवसाचा कालावधी दिल्याने पालक व विद्यार्थ्यांची धांदल उडाली आहे. शनिवारी तंत्रनिकेतन केंद्रावरून 300 तर रविवारी 1000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चितीसाठी आपली नावे नोंदविली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर सर्वत्र पैशाचा तुटवडा झाल्याने एटीएम केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागल्याचे चित्र होते. त्याचप्रमाणे रविवारी प्रवेश निश्चितीसाठी लांबलचक रांगा तंत्रनिकेतन प्रशालेत लागल्याचे दिसून येत होते. तंत्रनिकेतन प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला 5 हजार रूपये फी घेवून नोंदणी केली. मात्र विद्यार्थ्यांसाठी निवारा व पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय केली नसल्यामुळे त्या मुलीला चक्कर आल्याची चर्चा पालकवर्गातून व्यक्त होत होती. सायंकाळी उशिरापर्यंत विद्यार्थ्यांची गर्दी जैसे थे होती. रांगेत जेवढे विद्यार्थी-विद्यार्थीनी उभे आहेत त्या सर्वांचे फॉर्म भरले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्यामुळे दुरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.