इंजिनिअरींगचा पेपर घरात सोडविणार्‍या 26 विद्यार्थ्यांना पकडले

0

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सुरेवाडीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात सिव्हिल इंजिनिअरींगचा पेपर लिहिणार्‍या 26 विद्यार्थ्यांसह एका प्राध्यापकाला बुधवारी पोलिसांनी धाड टाकून पकडले. यामध्ये तीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. संबंधीत शिवसेना नगरसेवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून उत्तरपत्रिकाही जप्त केल्या आहेत. या घटनेनंतर ‘बामू’ विद्यापीठाने साई महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग परिक्षेचे केंद्र तात्काळ रद्द केले आहे. महाविद्यालयात पूर्वी झालेले सर्व विषयांचे पेपर रद्द करण्याचा इशाराही परीक्षा विभागप्रमुख डॉ. दिगंबर नेटके यांनी दिला आहे.

नगरसेवक, प्राध्यापक एकत्र
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षांचे पेपर मंगळवारी होते. साई महाविद्यालयात हे परीक्षा केंद्र होते. मात्र काल बीई सिव्हिलच्या तिसर्‍या वर्षाचे विद्यार्थी सिव्हिल कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड ड्रॉईंगचा पेपर दिल्यानंतरही तोच पेपर बुधवारी शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात काही विद्यार्थी सोडवत असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी येथे छापा टाकल्यानंतर येथे तब्बल 26 जण झालेला पेपर पुन्हा सोडवत असल्याचे दिसून आले. यात नगरसेवकांच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी नगरसेवक सुरे आणि काही प्राध्यापकही तेथेच उपस्थित होते.

चौकशी समिती नेमणार
तपासात जे विद्यार्थी आणि प्राध्यापक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, असे प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गंगाधर मुंडे यांनी दिली आहे. या घटनेची विद्यापीठाच्या परीक्षा मुल्यमापन मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. परीक्षा मंडळाचे संचालक डी. एम. नेटके आणि कुलसचिवांनी चौका येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज परीक्षा केंद्राला भेट दिली. या केंद्रात 3 मेपासून आतापर्यंत झालेल्या सर्व पेपर्सबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लवकरच समिती नेमणार असल्याचे नेटके यांनी सांगितले.