पानीपत । गुडगांवच्या फरूखनगर शहरामधील जमालपुरमध्ये राहणार्या विनोद कुमारने इंजिनिअरींगची नोकरी सोडून मोत्यांची शेती सुरू केली आहे. या शेतीतून तो आज 5 लाख रूपयांपेक्षा जास्त वार्षिक कमाई करत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसर्यांना ही शेती कशी करावी याचे प्रशिक्षणही तोे देतो. हमखास लाखो रुपयांची कमाई करुन देणार्या या शेतीची माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण विनोद कुमारकडे येत आहे.
विनोद कुमारचे वय 27 वर्ष आहे. त्याने सांगितले की, त्याने 2013 मध्ये मानेसर पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधून डिप्लोमा घेतला. त्यानंतर दोन वर्ष नोकरी केली. त्याचे वडीलही शेतकरी होते. प्रायव्हेट नोकरी करता करता त्याला शेतीत इंटरेस्ट होता. इंटरनेटवर आधुनिक शेतीची माहिती घेता घेता त्याला मोत्यांच्या शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर याबाबत आणखी माहिती घेतल्यावर त्याला कळले की, कमीत कमी पैशांमध्ये आणि कमीत कमी जागेत ही शेती केली जाऊ शकते. त्यानंतर त्याने देशातील मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण देणार्या एकमात्र सेंट्रल इन्स्टिट्य्ूत ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर भुवनेश्वर येथून एका आठवड्याचे प्रशिक्षण घेतले आणि लहान जागेत मोत्यांची शेती सुरू केली.
300 ते 1500 रू. किंमत
विनोदने सांगितले की, मोत्यांची किंमत त्यांची क्वालिटी पाहून ठरते. एक मोतीची किंमत 300 रूपयांपासून 1500 रूपयांपर्यंत मिळू शकते. याचे मार्केट सूरत, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकातामध्ये आहे. विदेशातही या मोत्यांना मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे मोत्यांचं उत्पन्न जास्त येतं ते परदेशात ते पाठवू शकतात.
कशी करता येते मोत्यांची शेती?
विनोद कुमारने सांगितले की, ‘ही शेती सुरू करण्यासाठी पाण्याच्या टँकची गरज असते. मेरठ, अलीगढ येथून 5 रूपये ते 15 रूपयांमध्ये शिंपले विकत घेतले जाऊ शकतात. मच्छिमारांकडे ते सहज मिळतात. या शिंपल्यांना 10 ते 12 महिने पाण्याच्या टँकमध्ये ठेवले जाते. जेव्हा शिंपल्याचा रंग सिल्व्हर होतो तेव्हा त्यात मोती तयार झाला असे समजावे.यासाठी लागणारा पूर्ण सेटअप उभा करण्यासाठी साधारण 60 हजार रूपयांचा खर्च येतो.