इंदापुरातील रस्ते झाले गायब

0

खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय : नगरपालिकेचे दुर्लक्ष

इंदापूर : शहरात विकाचा डांगोरा पिटणार्‍या इंदापूर नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांना शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासाचा पुरता विसर पडला असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. इंदापूर शहरातील बर्‍याच ठिकाणचे अंतर्गत डांबरी रस्ते गायब झाले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धुळ उडत असून खड्ड्यात जगोजागी पाणी साचल्याचे दिसत आहे.

इंदापूरच्या अनेक भागांतील डांबरीकरण केलेल्या रस्त्यांचे विकासकामांच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. डांबरी रस्त्यांचे खोदकाम झाल्यानंतर ते खोदलेले रस्ते पुन्हा डांबरीकरण न करता तसेच ठेवल्याने सदर रस्त्यात नुसते खड्डेच खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणचे रस्ते वाहतुकीच्या वर्दळीने खराब झाले आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा, वाहनचालकांचा व जेष्ठ नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असून अनेकवेळा या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघातही घडत आहेत. रस्ते दुरुस्तीच्याबाबतीत नगरपरिषद प्रशासन लक्ष देत नाही.

घरपट्टीत मोठ्याप्रमाणात वाढ

करभरणा करूनही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने इंदापूरसवासीय त्रस्त झाले आहेत. नगरपरिषदेने घरपट्टीतही मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. वाढीव रकमेचा बोजा नागरिकांना विनाकारण भरावा लागत आहे. नगरपरिषद शहराला एक दिवस आड करून पाणी पुरवठा करत असून, पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षभरासाठी आकारली जात आहे. एक दिवस आड पाणीपुरवठा होत असेल तर पाणीपट्टी सहा महिन्याचीच का आकारली जात नाही? असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत.

रस्ते दुरुस्तीची मागणी

नगरपरिषद नुसती बघ्याची भुमिका स्विकारून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे. शहरातील अनेक भागातील खड्डेयुक्त रस्त्यांमुळे नागरीकांना पायी चालत जाणे मुश्कील होऊन बसले आहे. तर मोटारसायकल व चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. लवकरात लवकर इंदापूर नगरपरिषद प्रशासन व संबंधित विभागाने शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीबाबत मार्ग काढून नागरीकांना खड्डेयुक्त रस्त्यांच्या त्रासातून मुक्त करावे व शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.