इंदापूर । इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात महास्वच्छता रॅली काढण्यात आली होती. तसेच विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील 19 शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. नगरिषदेचे कर्मचारीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता कर्मचार्यांची संख्या यात जास्त होती. कचरा गोळा करणार्या घंटागाड्याही स्वच्छतेचा संदेश देत या रॅलीत सहभागी झाले होते. नगरसेवकांना मात्र या रॅलीचे सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. या महारॅलीकडे त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
स्वच्छतेचा संदेश देणार्या घोषणांनी इंदापूर दणाणले होते. पथनाट्य, भारुड, लेझीम, स्वच्छता विषयक संदेश देणारे विद्यार्थ्यांच्या हातातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ही स्वच्छता रॅली इंदापूर नगरपरिषद मैदानावर स्थिरावली. नगरपरिषदेच्यावतीने आयोजीत स्वच्छ शाळा, महाविद्यालय स्पर्धेतील विजेत्या शाळांचा सन्मान कार्यक्रम पार पडला. 19 शाळांनी स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभाग घेतला होता. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, संजय चाकणे, कैलास कदम, पोपट शिंदे, मुकुंद शहा, भरत शहा, डॉ. श्रेणिक शहा, गारटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इंदापूर महाविद्यालयाची बाजी
महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक इंदापूर महाविद्यालयाने पटकावला. ना. रा. ज्यु.कॉलेज, कस्तुरबाई ज्यु. कॉलेज यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला. माध्यमिक विद्यालय गटात विद्याप्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, क्रांती ज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले माध्यमिक आश्रम शाळा, ना. रा. हायस्कुल यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक गटात जि. प. प्रा. शाळा सरस्वतीनगर, जि. प. शाळा क्र.4, तर तिसरा क्रमांक ना. रा. प्राथ. विद्यामंदिर, मराठी माध्यम यांनी बाजी मारली. विशेष प्राविण्य म्हणून जि. प. शाळा नं.2 यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
पथनाट्यातून जनजागृती
शालेय मुला-मुलींनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी पथनाट्य सादर केली. तर काही मुलींनी स्वच्छतेचा संदेश देणारी व्याख्याने देऊन स्वच्छतेविषयीचा जनजागृती संदेश दिला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी, नगराध्यक्षा अंकिता शहा, प्रा. संजय चाकणे, मुख्याधिकारी रामकुमार झंवर यांची भाषणे झाली. गटनेता कैलास कदम यांनी प्रस्ताविक केले, तर उपनगराध्यक्ष धनंजय पाटील यांनी आभार मानले.