इंदापुरातून मीच विधानसभा लढवणार : हर्षवर्धन पाटील

0

पुणे । रेडा विधानसभेची निवडणूक इंदापुरातून मीच लढवणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरीदेखील जागा वाटप करायला मीच आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. इंदापूर तालुक्यात गेल्या विधानसभेला स्पिडबेकर लागला. परंतू तालुक्यांतील जनतेचे कवडीचे काम विद्यमान आमदारांनी केले नाही अशी टिका आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

काटी (ता. इंदापूर) येथील जाहीर सभेत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, ऍड. कृष्णाजी यादव, श्रीमंत ढोले, देवकर, चंद्रकांत भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल सांवत, तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष तुषार खराडे, तालुका कार्याध्यक्ष सुनिल लोंटे, दिपक गुळवे, गावच्या सरपंच रमन वाघमोडे, विपुल वाघमोडे, तुषार खराडे, तेजेश पाटील, धनंजय गायकवाड, सागर वाघमोडे, निलेश ठोंबरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, भविष्यकाळ काँग्रेसचाच असेल, गाव येथे शाळा, रस्ते कशामुळे तर याचे उत्तर फक्त काँग्रेस आहे. भाजप काँग्रेसला बदनाम करीत आहे. आठ जिल्ह्यात दौरे झाले, राज्यात व देशात फक्त काँग्रेस येईल, असे वातावरण झाले आहे. तरूणांच्या रूपाने नव्या पिढीला व्यासपीठ पाहिजे म्हणून या तालुक्यांतील युवा संघटन निर्माण होणार आहे. यासाठी पाहिजे ती मदत करणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

तालुक्यात परिवर्तन केले पाहीजे
पाटील म्हणाले, मागच्या निवडणुकीत अडथळा ठरणारा स्पिडबेकर आता गेला आहे. फोर लेनचा हाय वे झाल्यासारखी स्थिती आमच्याकरिता आहे. विद्यमान आमदाराला काही टिकवता आलं नाही. 20 वर्षापासून केलेले काम पाहता गेल्या तीन वर्षांत झालेल्या कामाची तुलना केली तर प्रचंड तफावत आहे. निरा भिमा नदीत अडवलेले पाणी आता दिसत नाही. बंधारे कोरडे पडले आहेत. शेटफढ आणि वरकुटे तलावही कोरडे पडले आहेत. आता परिवर्तन केले पाहिजे, याकरिता प्रत्येक गावची मदत आता हवी, असे आवाहन पाटील यांनी केले.