इंदापूर । शनिवार दिनांक 13 जानेवारी 2018 रोजी इंदापूर व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा इंदापूरातील 100 फुटी रोडवरील मैदानात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनुसार खेळविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक शरद झोळसर, रोहित बंडा पाटील, भरत भुजबळ, रामराव पाडुळे, टी. व्ही. जाधव, शब्बीर पठाण, बापू घोगरे, इरफान मोमीन, स्वप्नील बोराटे, बापू शिंदे, बापू घोगरे, विकास मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इंदापूर तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी दुपारी 3 वाजता माजी सहकार व संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
57 संघांची नोंदणी
नॅशनल चॅम्पियन कबड्डीपटु स्वप्निल शिंदे, सुलतान डांगे, नितिन मदने हे नॅशनल खेळाडू या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. या स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून 5 हजार आसन क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी 500 रुपये ठेवण्यात आली आहे. राज्यातून 57 संघानी आत्तापर्यंत नावनोंदणी केली असून आणखी 40 च्या आसपास संघ या स्पर्धेत नाव नोंदणी करणार असल्याने या स्पर्धेत मोठी रंगत वाढणार आहे.
14 जानेवारीला बक्षीस वितरण
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 51, दुसरे बक्षीस 31, तिसरे बक्षीस 21 व चौथे बक्षीस 11 हजार रुपये ठेवण्यात आले असून उत्तेजनार्थ सर्वोत्कृृष्ट खेळाडू 5 हजार, उत्कृष्ट चढाई 3 हजार व उत्कृष्ट पकड 3 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 14 जानेवारीला रात्री 9 वाजता मैदानातच संपन्न होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेतील खेळाडुंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने मोफत करण्यात आली असून खेळाडुंना एक बाजुचा प्रवास खर्चही देण्यात येणार असल्यीची माहीती आयोजकांनी दिली.