इंदापुरात वाढतेय गावगुंडांची दहशत

0

गाव पुढार्‍यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरी वाढली : विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुधाकर बोराटे

इंदापूर : सावकारकी, भाईगीरी, रोडरोमिओ, गुंडागर्दी या माध्यमातून झटपट पैसे कमविण्याच्या नादात सध्या इंदापूर तालुक्यात गुंडगिरीची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. झटपट पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी चार दोन टुकार व रिकामटेकडे रोडरोमिओ हाताशी धरून अनेक सराईत गुंड सध्या इंदापुरात दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. या महिन्यात घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांवरून ते दिसून आले आहे. गुंडगिरीच्या माध्यमातून शहर व परिसरात तालुक्यातील गल्ली बोळात नवनवीन दादा, भाई उदयास आले आहे. या भाई, दादांच्या दहशतीमुळे सध्या इंदापुर तालुका दहशतीच्या सावटाखाली असल्याचे जाणवते.

तालुक्यात गुन्ह्यांची मालिका

तालुक्यात सध्या अनेेक छोट्या मोठ्या गुंडाकडून गुन्ह्यांची मालिकाच तयार होऊ लागली आहे. याचे लोण संपूर्ण तालुक्यात पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापुरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक भोसले यांना वर्गात जावून दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. निमगाव केतकी येथिल ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पान बाजारात हातात तलवार व कोयते घेऊन पान विक्रेत्या शेतकर्‍यावर भरदिवसा जिवघेणा हल्ला करण्यात आला होता. सावकाराकडून व्याजाने पैसे घेतलेल्या गोतोंडी येथील माने (वय 32) या इसमाचे सावकाराने अपहरण केले होते. त्यानंतर खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. महाविद्यालयात दाखला काढण्यासाठी आलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याला दोन सराईत गुन्हेगारांनी महाविद्यालयतच ठार मारण्याच प्रयत्न केला. एका महिन्याच्या कालावधीत या गंभीर घटना घडल्या आहेत.

15 रोडरोमिओंना ताब्यात घेऊन कारवाई

गावगुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी निर्भया पथकामार्फत इंदापुरातील रोडरोमिओंवर कारवाईचा बडगा उगारला होता. 15 रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु या कारवाईने गावगुंडाच्या टपोरीगीरीला आळा बसलेला दिसून येत नाही. कारण महाविद्यालयात पुन्हा विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या गावगुंडाची बाजू घेण्यासाठी तथाकथित समाजसुधारक व राजकीय पुढारी पुढे सरसावतात. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंभीर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.

20 दिवसांत दोन गंभीर घटना

इंदापूर महाविद्यालयात 20 दिवसांत दोन गंभीर घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. किरकोळ कारणासाठी बाहेरील गावगुंड विद्यालयाच्या आवारात नियमबाह्य प्रवेश करतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी व टपोरी भाई बनण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना जबर मारहाण करून दहशत पसरविण्यासाठी गुंडगीरी करताना दिसून येत आहेत.

…तर गुंडगिरी होईल बंद

तालुक्यात गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात बोकाळली असून याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु पोलिसांकडून करण्यात येत असलेली कारवाई ही कायद्याला धरून असल्याने गुन्हा दाखल होताच चार दोन दिवसानेे जामीन मिळवून हे नामचीन गुंड आपल्या कार्यात पुन्हा सक्रीय होत असतात. पैसेवाले व राजकीय आश्रयामुळे हे गुंड वारंवार गुन्हे करून दहशत पसरवून वाम मार्गाने गोरगरीब जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ज्या-ज्या वेळी घटना घडली आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु त्या गुन्ह्यातून त्याला सोडविण्यासाठी चार दोन पुढारी समोर येत असतील तर सर्वप्रथम अशा पुढार्‍यांवरच जबरी गुन्हे पोलिसांनी दाखल करण्याची भुमिका स्विकारल्यास तालुक्यातील सर्वच नामचीन गुंडाना आपले बस्तान गुंडाळून भाईगीरीचे उद्योग आपोआप बंद होतील यात तीळमात्र शंकाच नाही. यापुढे तालुक्यात कोणत्याही ठिकाणी गुन्हा घडल्यास सर्वप्रथम गुन्हा करणार्‍यापेक्षा गुन्हेगाराच्या डोक्यावर राजआश्रय ठेवणार्‍यांवरती गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याची भुमिका पोलीस खात्याने अंमलात आणल्यास तालुक्यातील संपुर्ण गुंडगीरी बंद होण्यास वेळ लागणार नाही. याबाबत पोलीस खात्याने पावले उचलण्याची मागणी संपूर्ण इंदापूर तालुक्यात जोर धरत आहे.