अजित पवार, दत्तात्रेय भरणे, हर्षवर्धन पाटील यांची गंभीर चर्चा
वसंत घुले
बारामती : महाराज इंदापूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे जोरात वारे वाहू लागले आहेत. येथे प्रस्थापित दिग्गज राज्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीने सगळ्यांचे डोळे विस्फारले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच कोचवर बसून इंदापूरचा तिढा कसा सोडवायचा या गहण चर्चेत रमले होते. एका बाजूला दत्तात्रेय भरणे, मध्यभागी अजित पवार, तर दुसर्या बाजूला हर्षवर्धन पाटील धीरगंभीर स्वरुपात चर्चा करताना दिसत आहेत.
इंदापूर पवार कुटुंबियांना त्रासदायक
इंदापूरचा तिढा पवार कुटूंबियांना त्रासदायकच असतो. बारामतीशेजारीच हा तालुका असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून असते. लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रिया सुळे यांना हर्षवर्धन पाटील यांनी मदत करायची मात्र विधानसभेला राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार उभा करायचा, असे आजवरचे चित्र दिसून आले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सतत झुलवल्याची जाणीव करूनसुध्दा हर्षवर्धन पाटील बारामतीकरांना तसे वचकूनच असतात, असे अनेकदा दिसून आले आहे. बारामतीकर आपल्याबरोबर खेळी खेळतात याची झलक 2014 साली पाटलांनी अनुभवल्यामुळे यावेळी सावधच पाऊले टाकायची असे तर या छायाचित्रातून पाटील हे पवारांना सुचवित नाहीत ना तर दुसर्या बाजूला मीही काही कमी नाही. 2019 ला पुन्हा आमदार होणारच त्यासाठी वाट बदलू, असे तर भरणे अजित पवारांना सूचवित नाहीत ना आणि या दोघांमध्ये अजित पवार यांचे सॅन्डविच झाल्याचे या छायाचित्रात दिसून येते आहे.
अजित पवार चिंतेत
यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसणार आहे. याचे महत्त्वाचे कारण राष्ट्रीय समाज पक्षाने ताकदीने सुरू केलेला लोकसंपर्क मोहिमेचा परिणाम जाणवत आहे. हा पक्ष पंधरा ते वीस हजार मतदान घेतल्यास तराजू कोणत्या बाजूला झुकेल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र या दोन्ही डाव्या उजव्यांना चांगलेच त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे दोघांच्याही मनातील भिती ही स्पष्टपणे दिसून येत असून अजित पवारदेखील चिंतेत पडलेले दिसून येतात. त्यामुळे नेमके कोणाचे पारडे जड याविषयी तर्कवितर्क केले जात आहेत.
रासपमुळे वाढणार डोकेदुखी
या तालुक्यातील जातीय समीकरणे लक्षात घेतल्यास माळी आणि धनगर हे सध्या या दोघांपासूनही कोस दूर आहेत. अशातच रासपने केलेला वेगात शिरकाव नेमका कोणाला धक्का देणार हाही प्रश्न उरतोच आहे. पवारांनी या मतदार संघात विकास कामे केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात नेमका विकास कोणाचा झाला. हा प्रश्न धनगर आणि माळी समाज विचारत आहे. कारण विकासातील विषमता ही स्पष्ट स्वरुपात या तालुक्यात दिसून येत आहे. या दोन्ही समाजाची मते नुसती निर्णायक नाहीत तर बदलाच्या स्वरुपातील आहेत. हे दोन्ही समाजच बदल करू शकतात हे आजवर दिसून आले आहे. पाटील आणि भरणे या दोन्ही समाजाला गृहीत धरून चालतात. या दोन्ही समाजातील तरुणपिढी आपण किती दिवस सतरंज्या उचलायच्या हा प्रश्न विचारत आहेत.
या छायाचित्राकडे जरा गंभीरपणे बघितल्यास या तीनही नेत्यांच्या चेहर्यावर आपले काय होणार? असे भाव दिसून येत आहेत मात्र असेच भाव मतदारांच्या विकासाविषयी दिसून येत नाहीत ही लोकभावना आहे. यापुढील काळात या लोकभावनेचे उत्तर द्यावे लागेल. बारामतीपेक्षा समृध्द असलेला हा तालुका विकासात मागे का? हाच प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे.