इंदापूर । पुणे जिल्ह्यातील इंदापूरसह नगर तसेच सोलापूर जिल्ह्याकरीता वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाहणी विदेशी तज्ज्ञांसह केंद्रीय पथकाकडून करण्यात आली असून उजनी धरणाची देशातील एक मॉडेल म्हणून तपासणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या तपासणीचे काम पुर्ण करून विशेष समिती दिल्लीला परतली आहे. यानुसार तयार करण्यात आलेला अहवाल देशपातळीवर मॉडेल ठरणार आहे.
विशेष समितीची नेमणूक
देशातील काही प्रमुख धरणांत उजनी धरणाचा उल्लेख केला जातो. या धरणातील पाणी, जलचर, गाळ-वाळू यासह धरणाची सुरक्षा इतर बाबींचा अभ्यास करण्याकरीता केंद्रीय पाणी आयोगाने एका विशेष समितीची नेमणूक केली होती. गेल्या आठवड्यात या समितीने धरणा संदर्भात सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. यामध्ये एका अमेरिकेतील भूगर्भ शास्त्रज्ञासह देशातील अन्य विविध तज्ज्ञ अभ्यासकांचा समावेश होता.
धरणाच्या मजबुतीकरणाचा अभ्यास
या समितीने धरणाचे मजबुतीकरण, हायड्रोमेकॅनिकल भागांची सुरक्षा याची माहिती घेतली आहे. उजनी धरणावर तयार झालेला अहवाल देशातील मोठे प्रकल्प संरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरू शकेल, असे मत या समितीने व्यक्त केले आहे. समितीने धरणा संदर्भातील अहवाल तयार केला असून तो तातडीने केंद्राला पाठविण्यात येणार आहे. ज्येष्ठ संशोधक गोपाळ कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी समितीत अमेरिकन भूगर्भ अभ्यासक फ्लिटं यांच्यासह सी. एस. माथूर, इ. डी. किलींत, विवेक त्रिपाठी, ए. के. सचंद्रा, वाय. पी. सरडा आदींचा समावेश होता.
जुनी कागदपत्रेही अभ्यासणार
केंद्रीय समितीने उजनी धरणाच्या 50 वर्षाच्या इतिहासातील सर्व नकाशे, कागदपत्रे, माती, खडकांची माहिती जुन्या कागदपत्रांच्या आधारे घेतली. राज्यपातळीवर झालेल्या पाहणीचे काही जुने अहवाल ताब्यात घेतले. त्याच्या आधारे धरणाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यात आला. समितीच्या तज्ज्ञांच्या सखोल अभ्यासाकरीता जुनी कागदपत्रे महत्त्वाची ठरली. याद्वारे तयार करण्यात येणारा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
उजनीच्या संरक्षणाचा अभ्यास
उजनी धरणाचे बांधकाम 50 वर्षांपूर्वीचे असून साधारण 40 वर्षांपासून येथे पाण्याची साठवणूक होत आहे. धरणाची पाहणी राज्य पातळीवरील पथकाने केली. केंद्रीय पथकाने तीन दिवसांच्या अभ्यासातून उजनीच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. समितीने तयार केलेल्या अहवालातून अनेक बाबीही स्पष्ट होतील, असे धरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौघुले यांनी सांगितले.