खासदार सुप्रिया सुळे : समर्थ व्यायाम मंडळ संचलित डॉ. एल. एस. कदम मतीमंद शाळेचे उद्घाटन
इंदापूर । समर्थ व्यायाम मंडळ संचलित डॉ. एल. एस. कदम मतीमंद व अपंगाची शाळा राज्यात नंबर एकचे मॉडेल बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. इंदापूर येथील मतीमंद व अपंग शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नव्या इमारतीचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, सुरेखा चवरे, महारुद्र पाटील, अमोल भिसे, अभिजीत तांबिले, अनुराधा गारटकर, हेमलता माळूंजकर, वसंतराव माळूंजकर, यशवंत माने, अशोक चोरमले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
शाळा अडचणीत
दिव्यांग मुलांसाठी काम करणार्या या समर्थ व्यायाम मंडळ संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. भाजप सरकार शिक्षण क्षेत्रासाठी दर आठवड्याला नवीन आदेश जारी करत आहे. यामुळे अपंग, मतिमंद तसेच इतर शाळा अडचणीत सापडल्या आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी दिव्यांगाना 15 ट्रासिकल, 10 व्हिलचेअर व 8 जयपूर फूट आदी साहित्याचे सुळे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
अपंग विद्यार्थ्यांना घडविणे कठीण
भटके विमुक्त, अपंग यांच्या अडचणी सोडवताना आलेल्या अनुभवातून माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. हुशार मुलांच्या मागे धावणार्या शाळा चालविणे खूप सोपे असते. परंतु शरीराची साथ न मिळणार्या विद्यार्थ्यांना घडविणे फार कठीण असते. तेच काम या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप गारटकर करीत आहेत. अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे सांगत आपली संस्था राज्यात एक आदर्श शाळा म्हणून निर्माण करा, असाही आशावाद खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकवर्गणीतून बांधल्या खोल्या
विद्यार्थ्यांना कसल्याही सुविधा येथे नव्हत्या. लोकवर्गणीतून वर्ग खोल्या सुरू केल्या. यासाठी राष्ट्रवादीची मदत मिळाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शाळेला भेट दिली. त्यामुळे सुविधा प्राप्त झाल्या. डॉ. एल. एस. कदम यांनी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जमीन दिली. त्यामुळे त्यांचे नाव शाळेला दिले, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. समारंभाच्या प्रारंभी खासदार सुळे यांचा अनुराधा गारटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर प्रदिप गारटकर यांचा सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभाचे प्रास्तविक संस्थेचे सचिव अमोल उन्हाळे यांनी केले.