इंदापूरातील लोक अदालतीमध्ये लाखोंची थकबाकी वसूल; 4732 प्रकरणे तडजोडीने निकाली

0

इंदापूर । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये इंदापूर न्यायालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 6 हजार 994 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 732 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून 86,04,991 इतकी उच्चांकी थकीत रक्कम वसूल झाल्याची माहीती इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अ. अ. शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रलंबीत प्रकरणांचा निवाडा
या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत दिवाणी दावे, तडजोडीस पात्र असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर झालेले कलम 138 ची प्रकरणे, तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद यांच्याकडील थकीत पाणीपट्टी व घरपट्टीची दाखलपूर्व प्रकरणे, तालुक्यातील सर्व बँकेकडील थकीत कर्जाऊ दाखलपूर्व प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या थकीत बिलाची दाखलपूर्व प्रकरणे व पोलिस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे असे एकूण 6 हजार 994 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

थकबाकी वसूल
6 हजार 994 प्रकरणांपैकी 4 हजार 732 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून 86,04,991 रुपयांची रक्कम वसूल झाल्याची माहीती इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अ. अ. शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. सदर लोकन्यायालयामध्ये 5 पॅनल तयार करण्यात आले होते. त्या पॅनलमध्ये इंदापूर न्यायालयात कार्यरत मुख्य न्यायाधीश अ. अ. शेख., पी. एन. कुलकर्णी, एस. बी. यादव, एन. ए. शेख., एन. पी. देशपांडे, अ‍ॅड. ऋषीकेष कोथमिरे, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अजिम शेख आदींनी पॅनल सदस्य म्हणून काम केले. सदरचे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष, अ‍ॅड. मधुकर ताटे, अश्फाक सय्यद, बापू साबळे व इतर ज्येष्ठ विधिज्ञानी सहकार्य केले. यावेळी सचिव किरण लोंढे उपस्थित होते.