इंदापूर उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर!

0

इंदापूर (सुधाकर बोराटे) । इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयातील तात्कालिन वैद्यकिय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांची 5 ऑगस्ट 2017 रोजी बारामती येथे बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. परिणामी रुग्णालयातील सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. वाढत्या असुविधांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रूग्णालयच आजारी पडल्याची स्थिती येथे दिसून येत आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व आधुनिकीकरणाचे काम मागील सव्वा तीन वर्षापासून कासवाच्या गतीने सुरू आहे. ट्रामा केअर सेंटरसह 100 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. असे असतानाच येथील तात्कालीन वैद्यकिय अधिक्षक डॉ. काळे यांची बदली झाली. त्यांच्या जागी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ. एकनाथ चंदनशिवे रुग्णालयाची सर्व जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु सध्या या रुग्णालयात सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.

डॉक्टरांचा मनमानी कारभार
रक्त, लघवी तपासणी विभागातील डॉक्टरांचा तर मनमानी कारभार सुरू आहे. विविध चाचण्या करण्यासाठी रुग्ण या विभागात गेल्यानंतर त्याच्याकडे मन मानेल त्या पद्धतीने पैशाची मागणी केली जाते. तपासणी झाल्यानंतर तपासणी फीच्या नावाखाली पुन्हा पैशाची मागणी केली जाते. पैसे भरल्याची पावती मागितली असता पावती मिळत नसते, असे उत्तर दिले जाते. खासगी दवाखान्यापेक्षा जास्त पैसे येथे भरण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे.

बेडशीटची कमतरता
रुग्ण दाखल करून घेण्यासाठी खाटा व गाद्या उपलब्ध आहेत. परंतु, त्यावर मागील कितीतरी दिवसांपासून बेडशिटच घालण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. डॉक्टर, कर्मचारी किंवा तेथील संबधीतांकडे बेडशीटची मागणी केल्यास त्या उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत असल्याने अडचणी वाढत आहेत.

तपासणी न करताच औषध
रुग्णालयाच्या भिंती गोवा, गुटखा, पान, तंबाखुने रंगविलेल्या दिसतात. दवाखान्यातील साफसफाई व स्वच्छतेबाबतचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साखर कारखाने चालू झाल्यामुळे कामगारांची गर्दी वाढली आहे. रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. ओपीडी विभागात डॉक्टरांची संख्य अपुरी असून ते शिकाऊ आहे. तरीदेखिल त्यांच्यामार्फतच रुग्णांची तपासणी केली जाते. हे नवनियुक्त ट्रेनी डॉक्टर व त्यांच्यासोबत असणारे अनुभवी डॉक्टर रुग्णाची तपासणी करण्यापेक्षा त्याला फक्त प्रश्‍न विचारून औषध गोळ्या देण्याचे काम करीत आहेत.

अस्वच्छ शौचालये
मेडीकल स्टोअरचे कर्मचारी मेडीकलला कडी लावून इतरत्र फिरताना अनेकदा दिसतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना इथे बराचवेळ ताटकळत थांबावे लागते. इमातरीच्या दुसर्‍या मजल्यावर डिलिव्हरी पेशंटचा वॉर्ड असून येथील शौचालयांमध्ये कायम दुर्गंधी पसरलेली असते. या घाणेरड्या वासामुळे डिलिव्हरी झालेली महिला आणि तिच्या नवजात बाळाच्या आरोग्यावर दुष्परीणाम होण्याची शक्यता असते. वैद्यकीय अधिक्षक मिळत नसल्याने रुग्णालयातील समस्या वाढत आहेत.

रुग्णांची आर्थिक लूट
काही मोजकी व ठराविक आजारावरील तात्पुरती औषधे दवाखान्यात उपलब्ध असल्याने इतर औषधे रुग्णाला बाहेरून आणायला सांगितली जातात. गोरगरीब रुग्णांच्या घरी एक वेळचे अन्न खायची पंचाईत आहे. परंतु इथे मात्र रुग्णांना खासगी दवाखान्यापेक्षाही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ज्यांची पैसे भरून औषध आणायची ऐपत नसेल अशा रुग्णाला फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे शासकीय रुग्णालय आहे की, खासगी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया रुग्ण व त्यांचे नातेवाईक देत आहेत.