इंदापूर ते धर्मविर गड सायकल रॅली

0

शिवजयंतीनिमित्त इंदापूर महाविद्यालयाचा उपक्रम

इंदापूर । इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी इंदापूर ते धर्मवीर गड सायकल रॅली काढून गडावर शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तक्रारवाडी ते डिकसळ असा साडेचार किलोमीटरचा प्रवास सायकल चालवून रॅलीमध्ये सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

इंदापूर महाविद्यालय गेल्या सात वर्षांपासून शिवजयंतीचा उत्सव विविध किल्ल्यावर सायकल रॅली काढून साजरा करीत आहे. या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रॅलीमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे तसेच 53 विद्यार्थी, 26 विद्यार्थिनी, 32 प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असे 111 जण यामध्ये सहभागी झाले होते.

महाराजांना वंदन
भिगवणपासून 40 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे जे क्रूर कर्म पेडगाव या ठिकाणी केले तो गड म्हणजे बहाद्दुर गड अर्थात धर्मवीर गड होय. जवळपास 365 एकराच्या परीसरात पसरलेला हा भुईकोट किल्ला आहे. छत्रपतींच्या रक्ताने पावन झालेल्या मातीला वंदन करायला सायकल रॅलीने विद्यार्थी धर्मवीर गडावर गेले. प्रा. भरत भुजबळ, प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. गौतम यादव, प्रा. महंमद मुलाणी, प्रा. सोमा पिसे, प्रा. सागर कदम आदी या रॅलीत सहभागी झाले.