इंदापूर बसस्थानकातील शौचालयांची दुरवस्था

0

इंदापूर । राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून इंदापूरमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त व राज्यातील चौथ्या क्रमांकाच्या सुसज्ज बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. सोयी सुविधा पुरविण्यात हे बसस्थानक राज्यभर चर्चेत राहीले. परंतु इंदापूर एसटी आगार प्रमुख, प्रशासनाच्या गलथान व वेळ काढू कारभारामुळे येथील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. याबाबत आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून या असुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

घाणीने भरली शौचालये
बस स्थानकातील महिला व पुरुष शौचालयांचे दरवाजे निखळून पडलेले आहेत. खिडक्याही गायब झाल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर पाण्याच्या अपुर्‍या व्यवस्थेमुळे महीला शौचालये घाणीने तुडूंब भरलेली आहे. ही घाण शौचालयासमोरील पोर्चमधे साचल्याने महीलांची गैरसोय होत आहे. रोडरोमीओ या शौचालयाच्या दिशेने सतत चकरा मारत असतात. महिला शौचालयात एकच ट्युब लाइट असून तिही व्यवस्थीत लागत नाही. ती चालू बंद, चालू बंद होत असल्याने डोळ्यांना त्रास होतो. पुरुष शौचालयातील फरशा तुटल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.

अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे
बस स्थानकातील शौचालयाची देखभाल व दुरुस्ती ही इंदापूर आगाराकडे आहे. परंतु महिन्याला जास्तीत जास्त 5 हजार रुपयापर्यंतचा खर्च करण्याचे अधिकार मला आहेत, असे आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी बोलताना सांगितले. याबाबत पुणे कार्यालयातील वरिष्ठांना आम्ही कल्पना देऊन त्या बाबतचा लेखी पाठपुरावा केला असल्याचे दळवी म्हणाले. परंतु लेखी पाठपुरावा कागदपत्र दाखविण्याची विनंती केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. यावरून अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. या अधिकार्‍यांना राजकीय पुढार्‍याचा वरदहस्त मिळत असल्याने ते निर्ढावल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा
महिला शौचालयातील गैरसोयींबद्दल तेथील सफाई कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता तुमच्या पदर पैशाने लाईट ट्युब, दरवाजे दुरूस्ती व नळ कनेक्शन जोडणी करून घ्या. आम्हाला याबाबतचा किरकोळ खर्च करण्याची परवानगी नाही अशी उत्तरे अधिकारी देतात, असे सांगितले. रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍याने कुठून पैसे आणायचे आणि देखभाल दुरुस्ती करायची? असे नाव न सांगण्याच्या अटीवर तेथील कर्मचारी सांगतात.

पाण्याच्या टाकीवर शेवाळे
पुरुष व महिला शौचालयाच्या बाहेरील बाजूस पिण्याच्या पाण्याची टाकी असून या टाकीच्या सभोवताली दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील पाण्याच्या तोट्या मोठ्या प्रमाणात गंजल्या आहेत. पाण्याच्या गळतीमुळे संपुर्ण टाकीवर शेवाळे पसरले आहे. अनेक वर्षापासून ही टाकी धूतली नसल्याने तिच्यात कीडे निर्माण होत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.