इंदापूर । सर्व शिक्षा अभियानाच्या लोकजागृती या उपक्रमातंर्गत आयोजीत शिक्षणाची वारी नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. इंदापूर व बारामती तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व शाळा व्यवस्थापन समितीच्या 41 जणांनी या वारीत सहभाग नोंदविला. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक काथवटे, विस्तार अधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख सुनिता कदम, विषय तज्ज्ञ तुकाराम पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी पार पडली.
या उक्रमात जवळपास 50 स्टॉल लावण्यात आले होते. बहुधा गणित विषय अवघड वाटतो. पण पहिलाच स्टाँल गणिता विषयी आवड निर्माण करणारा होता. कोनमापकाचा वापर करून अनेक साहित्य बनविण्यात आले होते. शाळा प्रगत होण्यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम, टाकाऊ पदार्थांपासून मुलतत्व समजावून देण्याचा एक अभिनव उपक्रम याठिकाणी पाहायला मिळाला. पुस्तकभिशी, विज्ञानकोडे, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने खेळाडू तयार करणारा प्रकल्प, भाषा समृद्धीच्या उपक्रमशील वाटा, विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त डिजीटल ग्लास बोर्ड, मुलींसाठी स्पर्श जाणिव जनजागृती अभियान असे विविध उपक्रम बघण्याची संधी मिळाली. इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकीच्या सतीश भोंग या शिक्षकाचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मुलांना सहज लिहता वाचता आले पाहिजेत, असे उपक्रम सतीश भोंग यांनी सादर केले होते. सुनिता कदम, तुकाराम पाडुळे, मधुकांत आगळे, राहुल जगताप, कैलास कदम, विरेंद्र गलांडे, निलकंठ शिंदे आदी मान्यवरांनी या वारीत सहभाग नोंदविला.