मुंबई | भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांनी देशाचे अखंडत्व टिकविण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या बालपणापासून ते राजकीय कारकिर्दीपर्यंतचा प्रवास स्वतंत्र भारताच्या इतिहासात उल्लेखनीय आहे. त्यांचे हे योगदान आपल्यासाठी आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असेल असे, गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काढले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. त्या प्रस्तावावर सभापती नाईक-निंबाळकर बोलत होते.
सभापती नाईक-निंबाळकर म्हणाले, श्रीमती गांधी यांनी घेतलेले धाडसी निर्णय केवळ देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचा नावलौकिक वाढविणारे होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे निर्णय घेतले. तसेच महिलांच्या संदर्भात केलेले कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरही उल्लेखनीय ठरले आहे. यामुळे त्यांची केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रभावी महिला नेत्या अशी ओळख निर्माण झाली. त्यांच्या या कणखर भूमिकेने आणि धाडसी निर्णयांनी भारताची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.