औरंगाबाद | माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिराजी गांधी जन्मशतब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ रविवारी औरंगाबाद येथून झाला. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार सुभाष झांबड, आमदार सुनिल केदार, आमदार एम.एम.शेख अध्यक्ष वक्फ बोर्ड, माजी आमदार कल्याणराव काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्मापासून मृत्यूपर्यंत इंदिराजींनी संघर्ष केला. त्या पंतप्रधान झाल्या तेव्हा देश कठिण परिस्थितीतून जात होता. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आजचा भारत घडला. अमेरिकेने अन्नधान्य पुरवठा बंद केला पण इंदिराजी खचल्या नाहीत त्यांनी हरितक्रांतीच्या माध्यमातून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले. इंदिरा गांधी यांनी एकाच वेळी विरोधक, पक्षातले विरोधक, अमेरिका, पाकिस्तान सारखी राष्ट्रे यांच्याशी लढाई लढल्या. जनता पार्टीच्या लोकांनी इंदिरा गांधीजी़वर अत्यंत घाणेरडे आरोप केले. इंजिराजींनी मोठ्या हिंमतीने त्यांचा मुकाबला केला. इंदिरा गांधीजींनी मला महाराष्ट्र नावाचे दुसरे घर दिले. त्यांच्या सांगण्यावरून मी महाराष्ट्रातल्या वाशिममधून निवडणूक लढलो आणि जिंकलो. इंदिराजींचे संघर्षमय जीवन काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उर्जास्त्रोत आहे. याच प्रेरणेतून काँग्रेस पक्ष पुन्हा विजयी होईल.
– गुलाम नबी आझाद
इंदिरा गांधीच्या उल्लेखाशिवाय या शतकाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. सिक्कीमचा भारतात विलय आणि बांग्लादेशची निर्मिती इंजिराजींनी केली. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याला विरोध होता ते लोक स्वातंत्र्यलढ्यांच्या मुल्यांवर आघात करण्याचे व स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसण्याचे काम करित आहेत.
– मोहन प्रकाश
भारत देश इंदिराजींच्या त्यागाला आणि कार्याला विसरू शकत नाही. अत्यंत कठिण परिस्थितीत इंदिराजींनी सक्षमपणे देशाचे नेतृत्व केले. आज देशात पारतंत्र्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला सत्तेवरून दूर करण्याची वेळ आली त्यासाठी चलेजाव सारखा लढा उभारण्याची गरज आहे. इंदिरा गांधींना बदनाम करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत त्यासाठी चित्रपट काढले जात आहेत पण त्यांचा प्रयत्न लोकांनी हाणून पाडला. RSS आणि भाजपकडून धर्मनिरपेक्षता मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण सर्वांनी तो रोखण्याची गरज आहे. भाजपवाले देश स्वच्छ करण्याच्या गप्पा मारत आहेत पण त्यांचे विचार स्वच्छ नाहीत. ज्यांचे विचार जातीयवादी आहेत. जे धर्माच्या नावावर भांडणे लावतात, ते देशाची स्वच्छता काय करणार?
इंदिराजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशातून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी लढा सुरु करण्यासाठी गरज आहे आणि तो लढा आज आम्ही मराठवाड्यातून सुरु केला आहे.
– अशोक चव्हाण
देशाला जगामध्ये अग्रस्थानी नेण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले इंदिराजींचे कार्य नव्या पिढी समोर येऊ नये म्हणून काही शक्ती काम करित आहेत. आपण सर्वांनी त्या शक्तीचा एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे.
– माणिकराव ठाकरे
इंदिरा गांधी हरितक्रांतीच्या प्रणेत्या आहेत. त्यांनी बांग्लादेश जन्माला घातला असे कार्य करणाऱ्या त्या जगातील एकमेव पंतप्रधान आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष तरूणांच्या हाती दिला. सिक्कीम भारतात विलीन केले.
पंजाबचा खलिस्तान होऊन दिला नाही. पंजाब आज भारतात आहे त्याचे श्रेय इंदिराजींना आहे त्याची किंमत त्यांनी आपले प्राण देऊन केली. जी किमया इंदिरा गांधींनी केली ती सोनिया गांधी यांनीही केली आहे. इतिहास बदलून इंदिराजींचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून सुरु आहे.
– सुरेश द्वादशीवार