राजगुरुनगर : खेड घाटातील इंदिरा पाझर तलावामुळे राजगुरुनगरच्या परिसरातील वाड्या-वस्त्या व आंबेगांव तालुक्यातील पेठ गांवच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
खेड परिसरात गेले तीन दिवस संततधार कोसळणार्या पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाजवळील खेड घाटातील इंदिरा पाझर तलाव शंभर टक्के भरला असून; अतिरिक्त पाणी तलावाच्या सांडीतून वाहू लागले आहे. या पाझर तलावाचे काम 1972च्या दुष्काळाप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हस्ते भूमिपूजन करून सुरू करण्यात आले होते. आज 45 वर्षानंतरही हा पाझर तलाव सुस्थितीत आहे. या पाझर तलावात सिमेंट काँक्रीटने बांधलेल्या विहिरीतून आसपासच्या वाड्या-वस्त्या व नजिकच्या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वेळा उन्हाळ्यात खेडच्या पूर्व भागांतील गावांना या तलावामधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
यावर्षी मान्सून सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच हा पाझर तलाव पहिल्यांदाच तुडुंब भरल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या परिसरातील शेतकर्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी लवकरच तलाव भरल्यामुळे वर्षभर शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे.