इंदुरीकारांचा समर्थकांना सबुरीचा सल्ला; मोर्चे, आंदोलन न करण्याचे आवाहन !

0

संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सम-विषम तिथीला स्त्रीसंग ठेवल्यास मुलगा-मुलगी होत असल्याचे विधान केल्याबद्दल ते वादात सापडले आहे. मात्र त्यांच्या पाठीशी मोठा समर्थक वर्ग असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून पाठींबा मिळत आहे. त्यांच्या समर्थकांमधून राजकारण होत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान इंदुरीकर यांनी समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये, असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे. ‘चलो नगर’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यानंतर इंदुरीकर यांनी पत्र काढले.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं वैतागलेल्या इंदुरीकरांनी नुकतेच कीर्तन सोडून शेती करण्याचे संकेत दिले. त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीमच सुरू झाली आहे.

इंदुरीकर महाराजांनी तात्काळ याची दखल घेत पत्रक काढले आहे. ‘आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले आहे.