इंदुर-मनमाड रेल्वेमार्ग लवकरच!

0

धुळे । अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या इंदूर ते मनमाड रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन करण्यात घेणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज धुळ्यात केली. ना. प्रभू यांनी आज या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना प्रभू बोलत होते . प्रभू पुढे म्हणाले की जनतेला केवळ खूष करण्यासाठी पुर्वी फक्त घोषणा व्हायच्या आताचे सरकार काम करते आणि मग बोलते मनमाड इंदूर मार्गाचा ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) 3 जुलै रोजी तयार होऊन रेल्वे बोर्डाला सादर झाला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली प्रक्रिया पूर्ण केली असून मध्य प्रदेश सरकारचे पत्र बाकी आहे यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे होणार आहे. दरम्यान, भुसावळ ते मुंबईच्या दरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची घोषणादेखील ना. सुरेश प्रभू यांनी याप्रसंगी केली.

मागण्यांचा वर्षाव
याप्रसंगी खासदार ए. टी. पाटील यांनी यापूर्वी जळगावबाबत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने नाराजी व्यक्त केली. अमळनेर-धुळे तसेच चाळीसगाव-औरंगाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असले तरी मंजुरी मिळत नाही. जळगाव येथून रोज 50 कंटेनर जातात मात्र माल साठविण्यासाठी पुरेसे स्टोरेज नाहीत. त्यामुळे भादली व पाळधी येथे सुविधा उपलब्ध करावी. तसेच जळगाव मनमाडसाठी तिसरी लाईन टाकण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. तर खासदार हीना गावित यांनी नागपूर-मुंबई व्हाया नंदूरबार मार्गे तसेच नंदुरबार-पुणे रेल्वे सुरु करण्याची मागणी केली.

धुळ्यावरील अन्याय दूर
इंदूर ते मनमाड या रेल्वे मार्गामुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. हा रेल्वे मार्ग 9 हजार कोटींचा असून यासाठी एकूण 3538 हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे. धुळ्याने देशाला खुप दिले पण धुळ्याला काही मिळत नव्हते तो अन्याय आता दूर होणार आहे. आता हा प्रकल्प स्वप्न राहणार नाही तर प्रत्यक्ष साकारणार आहे. असे सांगून ना. प्रभूंनी धुळे ते पुणे या रेल्वे गाडीस हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. ना. डॉ. सुभाष भामरे, ना. जयकुमार रावल, पालकमंत्री ना. दादा भुसे, खा. ए.टी. पाटील, रक्षा खडसे, डॉ. हीना गावित, आ. अनिल गोटे, आ. अमरीश पटेल. आ. स्मिता वाघ आदी उपस्थित होते.

भुसावळ-मुंबई नवी गाडी
खासदार ए.टी. पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू यांच्याकडे मुंबई ते भुसावळच्या दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या पाहता एक गाडी सुरू करण्याची मागणी केली. यावर ना. प्रभू यांनी तातडीने भुसावळ ते मुंबईच्या दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले.

असा आहे मार्ग
मंजूर झालेला मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग नाशिक, धुळे, जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बडवानी, धार, पश्चिम निमार आणि इंदूर जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गावरील मालेगाव, नवीन धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंधवा, धामणोद आणि महू अशी रेल्वे स्थानके असतील. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाचा 50 टक्के खर्च उचलण्यास संमती दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 357.37 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून 186 किलोमीटर, तर मध्य प्रदेशातून 171.37 किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित खर्च 8857.97 कोटी रुपये आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.