इंदूर । मागील काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे नाराज झालेल्या इंदूरकर क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारे वृत्त आले आहे. शहरात 24 सप्टेंबर रोजी होणार्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मोसम काहीसे मेहरबान होण्याची शक्यता आहे. पण सामन्यादरम्यान एक दोन वेळा पाऊस पडल्यास इंदूरकरांना कमी षटकांचा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. छत्तिसगढ आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मध्य भारतातील अनेक ठिकाणी काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे या सामन्याला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागातील अधिकार्यांनी 24 सप्टेंबर रोजी परिस्थितीत सुधारणा होईल असे सांगितले आहे. हवामान विभागाचे भोपाळ विभागीय संचालक इंद्रजीत शर्मा म्हणाले की, पुढील 24 तासांंमध्ये परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. सामना दिवसरात्र असल्यामुळे संध्याकाळी हवामान चांगले असू शकते.
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे क्युरेटर समंदरसिंग चौहान म्हणाले की, इंदूरमधील स्टेडियमध्ये पाण्याचा निचार करणारी यंत्रणा चांगली असल्यामुळे मैदानाला सुकवण्यात फारसा वेळ लागणार नाही. पाण्याचा निचरा होण्यासाठी मैदानाखाली 12 घोट्या छोट्या विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक ठिकाणी 60-60 फुटांची बोअरवेल आहे. याशिवाय 100 फुटांचे 48 अन्य बोअरवेल मैदानात आहेत. पाणी बाहेर काढण्यासाठी चार मोटरपंप तयार ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा संघटनेतील माळी कामासाठी बोवण्यात आले असून एकूण 80 माळी मैदानाची व्यवस्था बघत आहेत. संपूर्ण मैदान झाकले जाईल एवढे कव्हर संघटनेकडे असून त्याशिवाय तीन सुपर सॉपरपण आहेत.
सामना इंदूरमध्येच होणार
यादरम्यान एक दोन वेळा हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सामन्यातील षटके कमी होऊ शकतात पण सामना होणारच. इंदूरमध्ये गुरुवारी रात्री 2.30 वाजता सुरु झालेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी 12 वाजता रजा घेतली. पाऊस थांबल्यावर तीन तासांनी खेळपट्टीवरील कव्हर हटवून कर्मचारी मैदानाला अंतिम रुप देण्याच्या कामाला लागले होते. सामन्याची खेळपट्टी पूर्णपणे सुकी होती, तर आऊटफिल्डवर थोडसा ओलावा होता.