पुणे : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने काही भाग रुग्णालये आणि मेडिकल्स वगळता बंद करण्यात येणार आहे. वाघोलीत सर्वत्र भाजीपाला, किराणा माल, बेकरी, चिकन, मटण आदी साहित्य खरेदी करण्यासाठी वाघोली परिसरातील नागरिक वारंवार रस्त्यावर बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर १०, ११ व १२ एप्रिल रोजी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय नागरिक व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत घेतला आहे.
करोना व्यवस्थापनाबाबत सर्व उपाययोजना वाघोली परिसरात काटेकोरपणे केल्या जात आहेत. परंतु सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता वाघोली गावामध्ये नागरिकांची खुप ये-जा होत आहे. किराणामाल व भाजीपाला खरेदी करण्याच्या नावाखाली लोक बाहेर पडत आहेत. तसेच सदर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात नाही. त्यामुळे येथील प्रादुर्भाव कोणत्याही क्षणी वाढू शकतो.
याबाबत कोरोना विषाणुवरील गाव पातळीवरील सनियंत्रण समिती वाघोली यांच्या सभेमधील निर्णयानुसार व वाघोली गावामधील किराणा व भाजीपाला विक्रेते यांच्या बरोबर झालेल्या चर्चेमध्ये वाघोलीत शुक्रवार (दि.१०), शनिवार (दि.११), रविवार (दि.१२) रोजी स्वयंस्फूर्तीने गाव पातळीवर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळामध्ये सेवा मेडिकल, दवाखाने, दुध पुरवठा तसेच पशुसेवा व्यवसाय या सुविधा सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन सर्व किराणा दुकाने आणि भाजीपाला व्यवसायिकांसह इतर सर्वांना करण्यात आले आहे.