मुंबई । तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकालातील आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ या मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्या, अशी विनंती प्रिया पॉल हिने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. पॉल यांनी आणीबाणीची वस्तुस्थिती काय होती व ‘इंदू सरकार’ चित्रपटातील कथा काय आहे, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मधुर भांडारकरांना द्या, अशी विनंती याचिकेद्वारे केली आहे. बहुप्रतीक्षित ‘इंदू सरकार’ चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाचा केवळ 30 टक्के भाग आणीबाणीच्या वास्तवावर आधारित आहे, तर उर्वरित भाग काल्पनिक असल्याचा दावा मधुर भांडारकर यांनी अलीकडेच केला होता. यापैकी वास्तवावर आधारित भाग वगळला जाईपर्यंत ’इंदू सरकार’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने जारी केलेले प्रमाणपत्र रद्दबातल ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्या प्रिया पॉलने यांनी केली आहे. सेन्सॉर बोर्डाने 12 दृश्यांना कात्री लावून या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले होते. प्रिया पॉलच्या याचिकेची न्यायमूर्ती अनुप मोहता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दखल घेतली असून त्यावर 24 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.