मुंबई – मधूर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे नेते संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधित असल्याचे दिसून येते. या चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू शकतात. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आपण या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.