इंद्रायणीच्या प्रदूषणाची तक्रार केली थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यालयाकडे

0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग अत्यंत निष्क्रिय!
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हल्लाबोल

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. याकडे पालिकेचा निष्क्रिय पर्यावरण विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. या नदीच्या प्रदुषणाबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. याला पालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत याबाबत आगामी काळात राज्य सरकारसबोत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिरुर लोकसभा मतदार संघात येत असलेल्या भोसरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी आढळराव यांनी नुकतीच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. प्रलंबित प्रश्‍नांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना बैठकीची माहिती देताना ते बोलत होते. यावेळी महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

पालिकेच्या दुर्लक्षामुळेच प्रदुषण
यावेळी खासदार आढळराव म्हणाले की, चिखली, कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची गोदामे असून ही गोदामे जाळली जातात. त्यामुळे या परिसरात प्रदुषण वाढले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना प्रशासन या भंगार गोदामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. कारवाई केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असे उत्तर प्रशासनाकडून दिले जाते, हे चुकीचे आहे. सर्वपक्षाच्या लोकांना विचारात घेऊन कारवाई केली पाहिजे. हा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍न आहे. या प्रदुषणाच्या तक्रारी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे गेल्या आहेत. तरीदेखील महापालिका याची दखल घेत नाही. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंद्रायणीनदीबाबत झाली चर्चा
केंद्रीय पर्यावरण समितीची दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये इंद्रायणी नदी प्रदुषण आणि चिखली, कुदळवाडी परिसरातील प्रदुषणाबाबत गांभीर्याने चर्चा झाली. या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मी देखील या समितीत आहे. या समितीने देखील यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत आपण लवकरच उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

टपर्‍यांवर कारवाई करावी
भोसरी परिसरात अतिक्रमण वाढले आहे. सर्रासपणे टपर्‍या थाटल्या जात आहेत. टपर्‍यांच्या माध्यमातून गुंड पोसले जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, भोसरीत टपर्‍या असल्याचे माहित नसल्याचे आयुक्त सांगतात, हे हास्यास्पद आहे. येत्या आठ दिवसात या टपर्‍यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच टपर्‍यांच्या माध्यमातून गुंडगिरी करणार्‍यांवर देखील कारवाई करावी, अशी सूचना त्यांना केली आहे. भोसरी मतदार संघातील 600 स्केवर फुटापुढील 33 हजार 305 घरांचा शास्तीकर पुर्वलक्षी प्रभावाने माफ होऊ शकतो. परंतु, याबाबतचा मंत्रीमंडळाचा आदेश प्राप्त झाला नाही. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास भोसरीतून केवळ 18 तर शहरातून 56 अर्ज आल्याचे प्रशासनाने सांगितले. नियमावलीत जाचक अटी-शर्ती आहेत. गुंठ्याला तीन ते चार लाख रुपये भरावे लागतात. त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

अन्यथा गुन्हे दाखल करू
शहर संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या की, उद्योगधंद्यांचे रसायणमिश्रीत पाणी इंद्रायणी नदीत सोडणे बंद केले पाहिजे. महापालिकेने या गोष्टीवर बंधन आणले पाहिजे. अन्यथा पालिकेच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. तसेच अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाची नियमवालीत जाचक अटी आहेत. त्यामुळे अर्ज येत नाही. ही योजना फसवी आहे.