इंदोरीतून वाहणारी नदी दूषित : परीसरात दुर्गंधी, आरोग्य धोक्यात
तळेगाव स्टेशन । इंदोरीतून वाहणार्या इंद्रायणी नदी पात्रातील पाणी फारच दूषित झाले आहे. बेसुमार वाढलेली जलपर्णी व पात्रात सोडलेले सांडपाणी या कारणांमुळे इंदोरी परिसरातील इंद्रायणीचे संपूर्ण पात्र दुषित झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही अवस्था असल्याने पाण्यास काहीसा दुर्गंध सुटला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर बाबीची दखल घेत काही युवकांनी इंद्रायणीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका करण्याचा निर्धार केला.
बालाजी ग्रुप, मुकाई मित्र मंडळ, ज्योतिबा मित्र मंडळ, भक्तीशक्ती ग्रुप व ग्रामपंचायतमधील 20-25 युवकांनी इंद्रायणी जलपर्णी मुक्ती अभियानास 17 फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. यात उपसरपंच अंकुश ढोरे, सुहास राऊत, योगेश (बाळा) राऊत, शैलेश भसे, चेतन खांदवे, सचिन अवसरे, स्वप्निल भागवत, नितीन ढोरे, सचिन सुतार यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांचा सहभाग आहे.
दर रविवारी अभियान
नोकरी, व्यवसाय सांभाळून हे काम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक रविवारी हे अभियान राबविण्याचा निश्चय केला आहे. सध्या दोर, रस्सी, दाताळ व मोठ्या चारचाकी वाहनांच्या रबरी ट्यूब या साधनसामग्रीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. या युवकांचा ग्रुप नेहमीच विधायक सेवाभावी कामासाठी पुढे असतो. सार्वजनिक कार्यक्रमात स्वयंसेवकाची भूमिका बजावण्यात त्यांना मोठा उत्साह असतो.