एनडीआरएफच्या पथकाला आले यश
तळेगावः कातवी येथे इंद्रायणी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. रविवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला. चंदन रामलाल चौधरी (वय 25, रा. कातवी) असे या मयत तरुणाचे नाव आहे. मावळ येथील कातवीजवळ काल (शनिवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास चंदन पोहण्यासाठी गेला असताना अचानक पाण्यात बुडाला. स्थानिक नागरिकांनी याची मा हिती दिल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले. रविवारी पहाटेपासून पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. या कामात तेथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंपळे यांनी मदत केली.
दरम्यान, चंदन हा नोकरीनिमित्त या भागात स्थायिक झाला होता. बाहेरचा असल्यामुळे अद्याप त्याच्याविषयी आणखी माहिती मिळालेली नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे.